COVID-19 नं बदलला ‘या’ एअरलाइन्सचा इतिहास, 48 वर्षात प्रथमच झाला ‘तोटा’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सिंगापूर एअरलाइन्सला आपल्या ऑपरेटिंगच्या 48 वर्षांच्या इतिहासात प्रथमच तोटा झाला आहे. कोविड -19 मुळे लादलेल्या प्रवासी निर्बंधाचा फटका कंपनीलाही सहन करावा लागला आहे. कंपनीने सिंगापूरच्या शेअर बाजाराला गुरुवारी सांगितले की 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 21.2 कोटी सिंगापूर डॉलर (14.93 कोटी अमेरिकन डॉलर) चा तोटा झाला आहे.

गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा 68.3 कोटी सिंगापूर डॉलर (48.09 कोटी अमेरिकन डॉलर) इतका होता. कंपनीचा जानेवारी ते मार्च या कालावधीतील तोटा 73.2 कोटी सिंगापूर डॉलर (51.55 कोटी अमेरिकन डॉलर) आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला 20.3 कोटी सिंगापुर डॉलर (13.62 कोटी अमेरिकन डॉलर्स) चा नफा झाला होता.

सिंगापूर एअरलाइन्सने 1972 मध्ये आपले कामकाज सुरू केले. त्यानंतर आतापर्यंत प्रथमच कंपनीचे नुकसान झाले आहे. ही कंपनी भारतात टाटा समूहासोबत भागीदारीत विस्तार एअरलाइन्सचे देखील ऑपरेटिंग करते.