Covid-19 : देशात ‘कोरोना’मुळं मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाखाच्या पुढं, 24 तासात 79476 नवे पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 64 लाखांच्या पुढे गेली आहे, तर मृतांचा आकडा देखील एक लाखाच्या वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत कोरोनाचे 79 हजार 476 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 1069 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवीन रुग्ण आल्यानंतर देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या वाढून 64,73,544 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात कोरोनाचे 9 लाख 44 हजार 996 सक्रिय रुग्ण आहेत, तर कोरोनाच्या संसर्गामुळे 1 लाख 842 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 54 लाख 27 हजार 706 लोक यातून बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशात 11,32,657 कोरोना तपासणी झाली आहे. आयसीएमआरने म्हटले आहे की कोरोना तपासणीमुळे रुग्णांना शोधणे सोपे होते आणि ते लवकर निरोगी होतात. अमेरिका आणि ब्राझीलनंतर, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रात कोविड-19 चे 15,591 नवे रुग्ण

शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 15,591 नवीन रुग्ण आढळले आणि राज्यात संक्रमितांची संख्या 14,16,513 इतकी झाली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात आणखी 424 रुग्णांच्या मृत्यूनंतर आता मृतांचा आकडा 37,480 झाला आहे. विभागातर्फे सांगण्यात आले की, 13,480 रूग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, सध्या राज्यात एकूण रूग्णांची संख्या 11,17,730 इतकी आहे.

गुजरातमध्ये आढळले कोरोनाचे 1,310 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 1,310 नवीन रुग्ण आढळल्यानंतर शुक्रवारी संक्रमितांची संख्या आता 1,40,055 झाली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, या कालावधीत 15 रुग्णांचा मृत्यू झाला, त्यानंतर मृतांची संख्या 3,478 वर गेली आहे. गेल्या 24 तासात, संसर्गातून बरे झाल्यानंतर 1,250 लोकांना घरी सोडण्यात आले असून, बरे झालेल्या एकूण लोकांची संख्या 1,19,815 इतकी झाली आहे.

झारखंडमध्ये कोरोनाचे 736 नवे रुग्ण, एकूण संख्या 85,400 वर

झारखंडमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आणखी आठ जणांचा मृत्यू झाला आणि राज्यात मृतांचा आकडा 729 वर पोहचला आहे. संक्रमणाच्या 736 नवीन घटनांसह संक्रमित लोकांची संख्या 85400 पर्यंत वाढली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात संक्रमित 85400 रुग्णांपैकी 73428 जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्याशिवाय 11,243 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत 729 जणांचा मृत्यू झाला आहे