Covid-19 : हवेत 10 मीटरपर्यंत पसरू शकतो Corona Virus, मास्क आणि पंख्याबाबत नवीन गाईडलाइन जारी

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांच्या कार्यालयाने कोरोनाच्या संसर्गाबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. देशात पुन्हा एकदा सार्स CoV-2 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. रुग्णालयात आणि घरांमध्ये उत्तम व्हेंटिलेशनच्या माध्यमातून संसर्गाचा धोका कमी करता येतो. उत्तम व्हेंटिलेशनमुळे एका बाधित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्गाचा धोका होण्याची शक्यता कमी राहते, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ऑफिस आणि घरांमध्ये व्हेंटिलेशनच्या संदर्भात सल्ला दिला आहे. सेंट्रल एअर मँनेजमेंट सिस्टिम असलेल्या इमारतींत सेंट्रल एअर फिल्टरमध्ये सुधारणा केल्यामुळे खूप मदत होते. ऑफिस, ऑडिटोरियम, शॉपिंग मॉल आदींमध्ये गैबल फँन सिस्टीम आणि रुफ व्हेंटिलेटरचा वापराची शिफारस केली आहे. यात म्हटले आहे की, पंखा ठेवण्याची जागाही महत्त्वपूर्ण आहे. ज्या ठिकाणाहून दुषित हवा थेट अन्य कुणाकडेही जाईल अशा ठिकाणी पंखा असता कामा नये. एअरोसोल आणि ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होतो. कोरोना विषाणू हवेमध्ये 10 मीटरपर्यंत जातात. संक्रमित व्यक्तीच्या 2 मीटर परिसरात ड्रॉपलेट्सच्या पडतात. बाधित व्यक्तीमध्ये लक्षणे नसली तरी त्यांच्या शरीरातून पुरेशा ड्रॉपलेट्सच्या निघू शकतात, ज्यामुळे अधिक लोक बाधित होऊ शकतात. बाधित व्यक्तीकडून श्वास सोडणे, बोलणे, गाणे, हसणे, शिंकणे आदी क्रियांदरम्यान लाळ आणि नाकाच्या माध्यमातून ड्रॉपलेट्स आणि एअरोसोल बनू शकतात. अशा विषाणूच्या माध्यमातून संसर्ग होऊ शकतो. संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी डबल मास्क किंवा एन 95 मास्क वापरावा, असा सल्ला देण्यात आला आहे.