स्टेट बँकेच्या ग्राहकांनो, तुमच्यासाठी आहे ‘ही’ दिलासादायक बातमी; आता घबसल्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा देशातील हजारो ग्राहकांना होणार आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बँकेने हा निर्णय घेतला आहे.

स्टेट बँकेने आता ग्राहकांना दिलासा देत कोणत्याही खातेदाराला KYC अपडेट करण्यासाठी बँकेत बोलावण्याची गरज नसल्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, बँकेने 31 मेपर्यंत सर्व ग्राहकांना पोस्ट किंवा ईमेलद्वारे केव्हायसी अपडेट करण्याची परवानगी दिली आहे. याबाबतची माहिती स्टेट बँकेने एका ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. KYC अपडेट करण्यासाठी ग्राहकांना बँकेच्या कोणत्याही शाखेत जाण्याची गरज नाही. पोस्ट किंवा ईमेलद्वारे केव्हायसी अपडेट करता येऊ शकते. मात्र, KYC अपडेट न केल्यास खात्यावरून होणाऱ्या व्यवहारांवर लगाम लावण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

रिस्कनुसार अपडेट

बँकेकडून Low Risk ग्राहकांना दरवर्षी KYC अपडेट करण्यास सांगितले जाते. तर Medium Risk असलेल्या ग्राहकांना आठ वर्षांनंतर KYC अपडेट करण्यास सांगण्यात येते तर High Risk ग्राहकांना दर दोन वर्षांनी केव्हायसी अपडेट करण्याचे सांगितले जाते.

ही कागदपत्रे आवश्यक

KYC साठी ग्राहकांना आपल्या पत्त्याचा आणि ID प्रुफ द्यावे लागते. जर खातेदार 10 वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल, तर त्याचं खातं ऑपरेट करणाऱ्यांचे KYC अपडेट करावे लागेल. तसेच जर तुम्ही NRI असाल तुम्ही पासपोर्ट किंवा रेसिडेन्स व्हिसा कॉपी देऊ शकता.