‘कोरोना’च्या संकट काळात बदलले PF चे नियम, जाणून घ्या योगदानाचं गणित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही नोकरदारासाठी त्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम म्हणजे पीएफ सर्वात महत्वाचे असतो. भविष्यातील संरक्षणासाठी ही रक्कम सर्वात महत्वाचा फंड आहे. यात पैसे तर जमा होतातच, त्याचबरोबर सरकारकडून देखील व्याज मिळते. परंतु कोरोना संकटात सरकारने पीएफबाबत महत्त्वपूर्ण बदल केला आहे.

काय बदल झाला आहे?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) अंतर्गत सर्व नियोक्ते आणि कर्मचार्‍यांचे पीएफ योगदान अनुक्रमे २-२ टक्क्यांनी कमी केले आहे. आता पुढील तीन महिन्यांपर्यंत त्यांच्या मूळ पगाराच्या १२ टक्के ऐवजी केवळ १० टक्के योगदान देतील. त्याचप्रमाणे कंपन्यांनाही १२ टक्क्यांऐवजी १० टक्के योगदान द्यावे लागेल.

आतापर्यंत काय परिस्थिती होती?
कोणत्याही कर्मचार्‍याच्या मूळ पगाराच्या १२ टक्के योगदान कर्मचारी देतात आणि तेवढेच योगदान पीएफमध्ये नियोक्ता किंवा कंपनी देखील देते. कोणत्याही कंपनीच्या किंवा नियोक्ताच्या वाट्याच्या १२ टक्क्यांपैकी ८.३३ टक्के किंवा १२५० रुपये, जे कमी असेल ते, कर्मचारी पेन्शन योजनेत अर्थात ईपीएसमध्ये दिले जातात. तर उर्वरित ३.६७ टक्के रक्कम एवढे योगदान कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) मध्ये असते. याउलट कर्मचार्‍याच्या वाट्याच्या १२ टक्के ईपीएफ म्हणजे तुमच्या पीएफ फंडात जातो.

फायदा कि नुकसान ?
या निर्णयामुळे कर्मचार्‍यांना व नियोक्त्यांना एकूण ६,७५० कोटी रुपये रोख मिळतील, असे सरकारचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे अशा ४.३ कोटी कर्मचारी आणि ६.५ लाख नियोक्त्यांना फायदा होईल, जे कोरोना विषाणू महामारीमुळे आणि त्यापासून बचावासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे रोख समस्येला सामोरे जात आहेत. मात्र, या बदलात सरकारकडून कोणतीही मदत दिली जात नाही हेही एक सत्य आहे.

यामुळे आपले पीएफ योगदान कमी झाले आहे. मात्र, या निर्णयामुळे लोकांच्या पगारात वाढ होईल आणि कोरोना संकटात खिशात जास्त पैसे वाचतील. पण नुकसान पाहिले तर तुमच्या बचतीला हा धक्का बसला आहे. याचा अर्थ असा की आपण भविष्यातील सुरक्षेसाठी पीएफ म्हणून जमा करत असलेली रक्कम पुढील तीन महिन्यांपर्यंत कमी झाली आहे. पीएफची रक्कम कमी झाल्यावर व्याज म्हणून सरकारकडून मिळणारा नफा देखील कमी होईल, हे स्पष्ट आहे.

करावरीलही स्थिती स्पष्ट नाही
जरी आपण टॅक्सच्या दृष्टीने पाहिले तर परिस्थिती स्पष्ट नाही. खरंतर, पीएफ योगदानाचे प्रमाण कमी झाल्यास तुमची टेक होम सॅलरी वाढेल. अशा परिस्थितीत शक्यता आहे की, ज्यांचे उत्पन्न कालपर्यंत आयकर स्लॅबच्या अंतर्गत येत नव्हते, ते आता येऊ लागले आहेत. याशिवाय कालपर्यंत कमीतकमी टॅक्स स्लॅबमध्ये येणाऱ्या लोकांसाठी देखील एक समस्या बनू शकते. ईपीएफ योगदानावर कलम ८० सी अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळते. हेच कारण आहे की बरेच लोक कर बचतीसाठी पीएफचे योगदान वाढवतात.