मोदी सरकारकडून गरीबांसाठी 1.70 लाख कोटी रूपयांच्या ‘पॅकेज’ची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे देशाच्या विकासाची चाके थांबली आहेत. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर उद्योगधंदे बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमुळे केंद्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वंकष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. निर्मला सीतारण यांनी कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे झालेल्या नुकसानीवरून दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा आज पत्रकार परिषदेत केली.

पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊन केले आहे. गरीबांसाठी, कामगारांना तात्काळ मदत देण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांना मदत देण्यासाठी 1.70 लाख कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करत आहे. हे पैसे नागरिकांच्या थेट खात्यामध्ये टाकण्यात येतील, असे सीतारमण यांनी सांगितले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत हे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसे असावेत हा उद्देश या मागचा असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना व्हायरसमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी मोदी सरकारने तब्बल 1.70 लाख कोटी रुपयाचे प्रोत्साहन पॅकेज दिले आहे. या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि आरबीआय यांनी शिक्कामोर्तब केले आहे. हा निधी तब्बल 10 कोटी लोकांच्या थेट बँके खात्यात वळविण्यात येणार आहे. तसेच लॉकडाऊनमुळे परिणाम झालेल्या व्यवसायांना मदत करण्यासाठी वापरला जाणार आहे.