बापरे ! ‘या’ देशात कोरोनाची दुसरी नाहीतर तिसरी लाट, कडक Lockdown

लाहोर : वृत्तसंस्था – जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाने अनेक देशांना आपल्या विळख्यात घेतले आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र, काही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा आपले हात पाय पसरण्यास सुरुवात केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे येथील परिस्थिती बिकट होत गेली आहे. पाकिस्तानमधील प्रमुख सात शहरांमध्ये सोमवार (दि.15) पासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पंजाबमधील सात शहरांचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असून यामधून अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन पाकिस्तानातील पंजाब प्रांत सरकारने आपात्कालीन सेवा वगळता कोणालाही घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. लाहोर, रावळपिंडी, सरगोधा, फैसलाबाद, मुलतान, गुजरानवाला आणि गुजरामध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून ही शहरे बंद राहणार आहेत.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारने शनिवारी निवेदन जारी केले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या लागू करण्यात आलेला हा लॉकडाऊन दोन आठवड्यांचा असणार आहे. यानंतर निरीक्षणानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी असणार आहे. याशिवाय सार्वजनिक, खासगी किंवा कोणत्याही ठिकाणी सामाजिक, धार्मिक किंवा इतर कोणत्याही कारणासाठी मेळावे घेण्यास बंदी असणार आहे.

लॉकडाऊन दरम्यान हॉटेल्स बंद असली तरी होम डिलिव्हरी करण्यास परवानगी असणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या कालावधीत संपूर्ण राज्यात सर्व प्रकारच्या क्रीडा, सांस्कृतिक आणि इतर उपक्रमांवर बंदी असणार आहे. तसेच लाहोरसह तीन शहरातील 36 भागात स्मार्ट लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे.