PM Modi : ‘मंत्र्यांनो’, नागरिकांच्या संपर्कात रहा ! स्थानिक पातळीवरील समस्या ओळखून त्या तातडीने सोडवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोना व्हायरसने हाहा:कार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने स्थिती गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी सरकारचे सर्व विभाग एकजुटीने काम करत आहेत. मंत्र्यांनी आपल्या संबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या संपर्कात रहावे. त्यांची मदत करावी आणि त्यांचे म्हणणं जाणून घ्यावं. स्थानिक पातळीवरील समस्या ओळखून त्या तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना दिल्या.

तप्रधानांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळातील सदस्यांसह सरकारमधील वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे. जनतेत जावून त्यांच्या समस्या आणि मुद्दे सोडण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत मंत्र्यांना दिल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. यापूर्वी त्यांनी राज्यांच्या मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अनेकदा चर्चा केली आहे.

पंतप्रधान मोदींनी या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती ट्विट करुन दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेतला. राज्यांसोबत समन्वय ठेवून आरोग्य सुविधी वाढवणं आणि ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासह विविध उपाययोजनांवर चर्चा केली, असे पंतप्रधानांनी सांगितले. कोरोना महामारी ही शतकातील सर्वात मोठे संकट असून जगासमोरील आव्हान आहे, असे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.