Coronavirus : राजधानी दिल्लीत ‘कोरोना’बाधितांची संख्या 13000 पार, आतापर्यंत 261 जणांचा बळी

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – दिल्लीत कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 261 वर पोहोचली आहे. रविवारी संसर्गाची 508 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर राष्ट्रीय राजधानीत संसर्ग झालेल्यांची संख्या 13,418 वर गेली आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे की, आतापर्यंत एकूण 6,540 लोक या संसर्गातून बरे झाले आहेत तर 6,617 संक्रमित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी संसर्ग झालेल्यांची संख्या 12,910 होती आणि 231 लोकांचा मृत्यू झाला आहे.

त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह आणि त्यांची पत्नी अनिता यांचे कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान प्रवाशांना भोजन पुरविल्याबद्दल कौतुक केले. अनिता यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेला एक व्हिडिओ शेअर करताना केजरीवाल म्हणाले की, आपच्या खासदाराने शेकडो स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली. वरील व्हिडिओमध्ये, अनिता या कामगारांच्या बसमध्ये लोकांना फूड पॅकेट आणि मास्कचे वाटप करताना दिसत आहे.

केजरीवाल यांनी ट्वीट केले की, “आमचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह जी आणि त्यांची पत्नी अनिता जी दररोज गरीब लोकांना जेवण देत आहेत. त्यांनी शेकडो स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पोहचवण्यास मदत केली आहे. त्यांच्या या सेवेला सलाम. “