खुशखबर ! ‘या’ देशानं केला ‘कोरोना’ची लस बनविल्याचा दावा, शरीरातच नष्ट करतो ‘व्हायरस’ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्त्राईलने असा दावा केला आहे की त्यांनी कोरोना विषाणूची लस तयार केली असून ती लवकरच सर्वांना उपलब्ध होईल. इस्त्रायली संरक्षण मंत्री नफ्ताली बेन्‍नेट यांनी सोमवारी सांगितले की डिफेन्स बायोलॉजिकल संस्थेने कोरोना विषाणूची लस बनविली आहे. बेन्‍नेट यांच्या म्हणण्यानुसार, संस्थेने कोरोना विषाणूची प्रतिपिंडे तयार केली आहेत. इस्त्राईलचा असा दावा आहे की ही लस विकसित केली गेली असून पेटंट आणि उत्पादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

इस्त्राईलच्या एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार कोरोना लस बनविल्याचा दावा करणाऱ्या इस्त्राईल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्च नावाची ही संस्था इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयांर्गत अत्यंत गुप्तपणे काम करते. रविवारी जैविक संशोधन संस्थेला भेट दिल्यानंतर बेन्‍नेट यांनी ही घोषणा केली. संरक्षणमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, हे प्रतिपिंड मोनोक्लोनल पद्धतीने कोरोना विषाणूवर हल्ला करतात आणि संक्रमित लोकांच्या शरीरात कोरोना विषाणूचा नाश करतात.

पेटंट मिळताच सुरू होईल उत्पादन
इस्त्रायली संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की ही लस विकसित केली गेली आहे आणि आता त्यास पेटंट देण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांत आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्यांशी व्यावसायिक स्तरावर उत्पादनासाठी चर्चा सुरू होईल. बेन्‍नेट म्हणाले, ‘या महान यशाबद्दल मला संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे.’ तथापि इस्त्राईलने हे अद्याप सांगितले नाही की या लसीचा मनुष्यांवर वापर करण्यात आला आहे की नाही. बेन्‍नेट म्हणाले की, इस्त्राईल आता आपल्या नागरिकांचे आरोग्य व अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेत संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.

पूर्वी देखील केला होता दावा
याआधीही इस्त्राईलच्या तेल अवीव (Tel Aviv) विद्यापीठात काम करणाऱ्या एका इस्त्रायली शास्त्रज्ञाने कोरोना विषाणूसाठी लस डिझाइनचे पेटंट मिळवले होते, त्यानंतर या लसीची चर्चा सुरू झाली. तेल अवीव विद्यापीठाने एक निवेदनात म्हटले होते की हे पेटंट ‘युनायटेड स्टेट्स पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस’ ने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही लस कोरोना विषाणू (Covid19) च्या संरचनेत थेट इजा करून निष्प्रभावी करण्यास सक्षम आहे. ही लस विद्यापीठाच्या जॉर्ज एस वाईज फॅकल्टी ऑफ लाइफ सायन्सेस मधील स्कूल ऑफ मॉलिक्युलर सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजीचे प्रोफेसर जोनाथन गरशोनी यांनी विकसित केली होती. निवेदनात म्हटले होते की औषध विकसित करण्यास अजून बरेच महिने लागू शकतात. यानंतर, त्याच्या क्लिनिकल चाचणीचा टप्पा सुरू होईल.