राज्यपालांनी ‘तो’ प्रस्ताव फेटाळल्यास….

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील विधानपरिषदेच्या 9 जागांवरील निवडणुका तहकूब करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करण्याची शिफारस 6 एप्रिल रोजी मंत्रिमंडळाकडून करण्यात आली होती. मात्र, अद्यापही राज्यपालांनी कोणताही निर्णय दिलेला नाही. राज्यपाल हे कायदेशीर सल्ला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. जर राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा प्रस्ताव फेटाळला तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागणार आहे.

विधानपरिषदेच्या 9 पैकी कोणत्याही एक जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवडणूक लढवणार आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या नंतर उद्धव ठाकरे यांना अतिशय कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना 6 महिन्यांत विधिमंडळात सदस्यत्व घेणे बंधनकारक केले आहे. घटनेच्या अनुच्छेद 164 (4) नुसार कोणतेही मंत्री किंवा मुख्यमंत्री जे सतत 6 महिन्यांपर्यंत कोणत्याही राज्याचे विधानसभेचे सदस्य नसल्यास त्यांना कालावधीच्या शेवटी मंत्रिपद सोडणे बंधनकारक आहे. उद्धव ठाकरे हे 27 मेपूर्वी विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सभासद होणे आवश्यक होते, पण सद्य परिस्थितीत कोरोनामुळे महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. राज्यातील 9 विधानपरिषदांच्या जागा 15 एप्रिल रोजी रिक्त झाल्या असल्या तरी कोरोनामुळे निवडणूक आयोगाने या जागांवरील निवडणुका अनिश्चित काळासाठी तहकूब केल्या आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र हळूहळू राजकीय संकटाकडे वाटचाल करत असल्याचे दिसते.