भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधन : ‘कोरोना’ नाकातून मेंदूत पोहचून आशा प्रकारे करू शकतो नुकसान, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणू संदर्भात आतापर्यंत केलेल्या संशोधनात अनेक प्रकारची माहिती समोर आली आहे. यामध्ये, विषाणूचे स्वरूप, त्याच्या संक्रमण पसरविण्याच्या प्रकारापासून त्याचे म्युटेशन म्हणजेच रूप बदलण्याच्या पद्धतींवर बरेच संशोधन केले गेले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, एकीकडे त्याच्या औषधाबद्दल वैज्ञानिक संशोधन सुरू आहे, तर दुसरीकडे बऱ्याच कंपन्या त्याची लस तयार करण्यात गुंतली आहेत. आता भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शास्त्रज्ञांच्या सूचना विचारात घेतल्यास कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोकादेखील शोधला जाऊ शकतो.

कोलकातास्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी (आयआयसीबी), कोलकाता येथील संशोधकांनी दावा केला आहे की, कोरोना विषाणू मेंदूच्या त्या भागास संक्रमित करू शकतो ज्यामुळे श्वास घेण्याची क्षमता नियंत्रित होते. मेंदूच्या या भागास रेस्पिरेट्री सेंटर ऑफ ब्रेन म्हणतात. संशोधकांनी सुचवले की, मज्जासंस्थेच्या या भागावर लक्ष ठेवले पाहिजे. असे केल्याने हे ओळखले जाऊ शकते की, कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका किती आहे. आयआयसीबीच्या संशोधकांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणू नाकातून मेंदूच्या ऑलफॅक्टरी बल्बमध्ये जाऊ शकतो. हा मेंदूचा तो भाग आहे जो श्वासाच्या गतीवर नियंत्रण ठेवतो. मेंदूच्या या भागाचे नुकसान म्हणजे कोरोना रुग्णाचा मृत्यू. दरम्यान, सध्या कमी प्रकरणांमध्ये असे घडत आहे.

संशोधकांचा दावा आहे की, हे त्या प्रकारचे पहिले संशोधन आहे ज्यामुळे रुग्णाच्या कोरोना आणि मेंदूशी संबंधित असलेल्या श्वासाचा संबंध दिसून येतो. संशोधकांच्या मते, कोरोना रूग्णांमध्ये इतर अवयवांपेक्षा फुफ्फुसांवर जास्त परिणाम होतो. त्याच वेळी, कोरोना विषाणूचा रुग्णांमध्ये मेंदूवर परिणाम देखील होतो. या शोध पथकात डॉ प्रेम त्रिपाठी, डॉ. अमित श्रीवास्तव, डॉ. उपासना रे आणि डॉ. सोनू गांधी यांचा समावेश आहे.

कोरोनाचा रूट
संशोधकांच्या मते, कोरोना रूग्णांमध्ये सेरोब्रोस्पिनल फ्लुईड आणि मृत्यूनंतर मेंदूचे पोस्टमॉर्टम करून बर्‍याच गोष्टींचा तपास केला जाऊ शकतो. यामुळे कोरोना नाकातून मेंदूपर्यंत कसा पोहोचला आणि मेंदूच्या श्वसन प्रणालीवर त्याचा कसा परिणाम झाला, ही माहिती समोर येऊ शकते.

मेंदूशी संबंधित लक्षणे दिसल्यास, …
संशोधकांच्या या अहवालानुसार कोरोना विषाणू मेंदूच्या रेस्पिरेट्री सेंटर ऑफ ब्रेन पूर्णपणे बंद करू शकतो. संशोधकांनी शिफारस केली आहे की, जर कोरोना रूग्णांत भ्रमनिरास होण्याची चिन्हे दिसली तर त्यांना वेगळे ठेवले पाहिजे, जेणेकरून त्यांचे जवळून परीक्षण केले जाऊ शकते. तसेच कोरोनामुळे मृत्यू होण्याचे पहिले कारण मेंदू नसल्याचे नोंदवले गेले आहे, परंतु उपचारादरम्यान मेंदूत श्वसन प्रणालीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.