Coronavirus : मुंबई गेल्या 24 तासात 1197 रूग्ण झाले ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत असून मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या लाखाच्या जवळ पोहचली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 1390 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 96 हजार 253 वर पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्क्यांवर पोहचले आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात 62 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईत 5464 जणांचा आतापर्यंत कोरोना आजारामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत 22959 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्ण वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जवळपास नवीन बाधित रुग्णांइतकेच रुग्ण दररोज कोरोनावर मात करून घरी परतत आहेत. आज 1197 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 67 हजार 830 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई पालिकेने आज मुंबईतील कोरोना संसर्गाबाबत सद्यस्थिती सांगितली असून हे आकडे फारच बोलके व कोरोनाची भीती कमी करणारे आहेत. मुंबईत विविध कोविड हॉस्पिटलमध्ये सध्या 1053 व्हेंटिलेटर कार्यान्वित आहेत. विशेष म्हणजे यापैकी 125 व्हेंटिलेटर सध्या विनावपर आहेत. म्हणजेच व्हेंटिलेटरची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली असून हे चांगले संकेत आहेत व मुंबईतील कोरोना संसर्गाचा धोका वेगाने कमी होत असल्याचेच यावरून दिसत असल्याचे मुंबई पालिकेने म्हटले आहे.