लंडनच्या ‘फ्लाईट’वर बंदीची शक्यता; आज निर्णय होणार, ‘कोरोना’चा नवा प्रकार आला समोर

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार (स्टेन)समोर आला आहे. त्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तातडीची बैठक बोलविली आहे. त्यात ब्रिटनमधून येणार्‍या प्रवाशांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यात लंडनहून येणार्‍या विमानांवर बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरत असतानाच त्याचे नवीन रुप समोर आले आहे. त्यामुळे जगभरात नवे टेंशन निर्माण झाले आहे. युरोपातील ५ देशांमध्ये विमानांना बंदी घालण्यात आली असून पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे.

युरोपीय संंघाच्या देशांमध्ये ब्रिटनहून येणार्‍या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. तर ब्रिटेनमध्ये रेल्वेसेवा देखील बंद करण्यात आल्या आहेत. या नव्या संकटाला तोंड देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने आज एका बैठकीचे आयोजन केले आहे. त्यात नागरी विमानोड्डाण मंत्रालयासह विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी यांनाही आमंत्रित केले आहे. त्यामुळे या बैठकीत लंडनहून येणार्‍या विमानांवर बंदी घालून देशात कोरोनाचा नव्या रुपातील संसर्गाचा धोका टाळण्यात येण्याची शक्यता आहे.