COVID-19 : नंबर – 1 टेनिस स्टार नोवाक जोकोविचला झाला Corona, बायकोही पॉझिटिव्ह

बेलग्रेड : वृत्तसंस्था –  जगभरात कोरोना व्हायरस प्रकोप अजूनही सुरूच आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी हा प्रकोप आणखी वाढला आहे. जगभरात सर्वसामान्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील कोरोनाने गाठले आहे. क्रीडा, कला, राजकारण अशा विविध क्षेत्रात कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. अनेक राजकीय नेते, खेळाडू, अभिनेते यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेला टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच याला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. जोकोविचच्या पत्नीची कोरोना टेस्टसुद्धा पॉझिटिव्ह आली आहे.

एका टेनिस टूर्नामेंटला गेला असताना इतर काही संसर्ग झालेल्या खेळाडूंपासून जोकोविचला लागण झाली असल्याचे समजते. जोकोविचला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या टीमने एक प्रसिद्धी पत्रक काढलं असून यामध्ये म्हटले आहे की, मंगळवारी आलेल्या चाचणी अहवालात जोकोविचला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. जोकोविचच्या दोन मुलांची चाचणी मात्र निगेटिव्ह असली तरी त्याच्या पत्नीला कोरोना झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे.

टेनिस टूर्नामेंटवरून जोकोविच बेलग्रेडला पोहोचल्यानंतर प्रथम त्याने कोरोना चाचणी करून घेतली. क्रोएशियाच्या नियमांप्रमाणे लक्षणं दिसत नसल्यामुळे जोकोविचची चाचणी झाली नव्हती. त्यामुळे आपल्या देशात म्हणजे सर्बियात परत आल्यानंतर लगेच त्याने चाचणी घेतली. या चाचणीत तो आणि त्याची पत्नी पॉझिटीव्ह आढळले आहेत.