राजकीय युध्द पेटलं ! देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे सरकारवर ‘गंभीर’ आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोना संसर्गित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. शुक्रवारी राज्यात सर्वाधिक रुग्ण उपचारानंतर घरी सोडल्याचा दावा राज्य सरकारने केला होता. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. राज्यात सरकारकडून आकड्यांची फेकाफेकी सुरु आहे. आयसीएमआरने दिलेल्या सूचनांचे सरकारकडून पालन होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

एका वृत्तवाहिनीला बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, शुक्रवारी सरकारने ८३८१ रुग्णांना घरी सोडल्याचा दावा केला आहे. तर ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. अर्थात रुग्ण घरी जाण्याचं प्रमाण जास्त असतानाच मृतांची संख्या देखील सर्वात जास्त आहे. रुग्ण बरे होत आहेत हे दाखविण्याच्या घाईत त्यांचे मृत्यू होण्याच प्रमाण सुद्धा वाढत आहे. आपला लढा आकडेवारीशी नाही, तर कोरोना संसर्गाविरुद्ध आहे, त्यावरती लक्ष केंद्रित करा, ही पुन्हा विनंती ! असं म्हणत त्यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील फडणवीसांनी सरकारवर टीका करत, राज्य सरकारने पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यावरती प्रत्युत्तर देताना राजकारण करून  पॅकेज जाहीर करण्यापेक्षा काम करणं जास्त महत्वाचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.

देशात गेल्या २४ तासांमध्ये आतापर्यंत सार्वधिक रुग्णांची तसेच मृतांची संख्या नोंद केली आहे. देशात गेल्या २४ तासात ७९६४ कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढली असून, २६५ जणांचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाने सांगितलं आहे. तसेच आतापर्यंत १,७३,७६३ जणांना कोरोना संसर्गाची लागणं झाली असून, त्यापैकी ८२,३७० जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आलं आहे. तर ४,९७१ रुग्णांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर ४७.४० टक्क्यांवर पोहचला आहे.