Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा हाहाकार ! गेल्या 24 तासात 17 जणांचा मृत्यू तर 547 नवे पॉझिटिव्ह

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. शहरात आज 547 रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर 17 जणांना कोरोना आजारामुळे जीव गमवावा लागला आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने 9 हजाराचा टप्पा ओलांडला असून शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 9104 इतकी झली आहे. शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

शहरामध्ये एकाच दिवशी 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 13 रुग्ण पिंपरी चिंचवड शहरातील आहेत. तर 4 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत शहरामध्ये 205 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये शहरातील 156 रुग्ण तर शहराबाहेरील 49 रुग्णांचा समावेश आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 501 रुग्ण शहरातील असून 46 रुग्ण शहराबाहेरील आहे. या रुग्णांसह 273 शहराबाहेरील रुग्णांवर पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर शहरातील 35 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज शहरामध्ये 324 रुग्णांची दुसरी कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 5559 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शहरामध्ये सध्या 2337 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज एकाच दिवशी 17 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, मिलिंदनगर, नवी सांगवी, थेरगांव, तळवडे, मोशी, निगडी, चाकण, तळेगाव रोड, कात्रज आणि महाबळेश्वर येथील रुग्णांचा समावेश आहे.