MS धोनीने ‘कोरोना’मुळे निवृत्ती घेतली असावी : युजवेंद्र चहल

माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. धोनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ टाकत निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. अनेक चाहत्यांना त्याने टी-20 विश्वचषकात खेळावे अशी इच्छा होती. दरम्यान, कोरोनामुळे धोनीने निवृत्ती घेतली असावी असे मत भारतीय संघाचा युवा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने व्यक्त केले आहे.

चहल म्हणाला, कोरोनामुळे धोनीने हा निर्णय घेतला असावा. नाहीतर धोनी टी-20 विश्वचषकापर्यंत खेळला असता. त्याने अजुनही टी-20 विश्वचषकात खेळावे अशी आमची इच्छा आहे. सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तयारी करण्यासाठी तो कँपमध्ये दाखल झाला आहे. धोनीमुळे कुलदीप आणि मी यशस्वी झालो आहे. आम्हाला त्याच्याकडून खूप मदत मिळत होती.

ज्यावेळी धोनी यष्टींमागे असायचा त्यावेळी आमचे 50 टक्के काम झालेले असायचे. खेळपट्टी कशी आहे, पुढे ती कसे रंग दाखवेल हे धोनीचा बरोबर कळत होते. धोनी नसेल त्यावेळी या सर्व गोष्टी आम्हाला कराव्या लागणार आहेत. धोनीला अखेरचा सामना मिळायला हवा की नाही हे विचारले असता चहलने हा निर्णय बीसीसीआयने घ्यायचा आहे असे सांगितले आहे.