Coronavirus : ‘कोरोना’बाधित रुग्ण डॉक्टरांवर थुंकला, तरीही त्यांनी केले ‘उपचार’

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – पनवेल शहरात सोमवारी सापडलेल्या कोरोना बाधिता रुग्णावर उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या अंगावर थुंकण्याचा प्रकार घडला. याबाबत पनवेल शहरातील कोरोना रुग्णालयाच्या आरोग्य अधिकार्‍यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

हा रुग्ण इस्त्राईल तलावाशेजारील एका इमारतीत राहतो. तो कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यावर पालिकेच्या कर्मचार्‍यांनी त्याला कोविड १९ या स्वतंत्र रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, त्याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेण्याची इच्छा होती. त्यामुळे रुग्ण आणि आरोग्य अधिकारी यांच्यात वाद झाला. त्यातून उपचारासाठी डॉक्टर त्याच्या कक्षेत गेल्यावर तो डॉक्टरांच्या अंगावर थुंकला. त्यामुळे डॉक्टर आणि परिचारिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. सुदैवाने डॉक्टरांनी सुरक्षा कवच (पीपीई) घातलेले असल्याने अनर्थ टळला. त्या प्रकारानंतरही डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करणे हे पहिले कर्तव्य असल्याचे सांगत त्याला उपचार दिले.