‘कोरोना’ची लागण झालेल्या महिलेनं दिला जुळ्या मुलांना जन्म, 1 ‘पॉझिटीव्ह’ तर दुसरे ‘निगेटीव्ह’, सर्वजण ‘हैराण’

महेसाणा : गुजरातमध्ये एका 30 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. या जुळ्यांपैकी मुलगा पॉझिटीव्ह आणि मुलगी निगेटीव्ह जन्मली आहे. व्हायरसच्या संसर्गाचे हे प्रकरण पाहून डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. गुजरातमध्ये असे प्रकरण प्रथमच समोर आले आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाने अहवाल संशयास्पद असल्याचे म्हणत पुन्हा तपासणी करण्यासाठी नवजात बाळांचे सॅम्पल घेण्यास सांगितले आहे.

वडनगरच्या मोलीपुरामध्ये ही जुळी मुले जन्माला आली आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या या महिलेने शनिवारी वडनगरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये जुळ्या बाळांना जन्म दिला.

आई कोरोना व्हायरस संक्रमित असल्याने दोन्ही नवजात बाळांचे सॅम्पल पाठवण्यात आले होते. जेव्हा त्यांचे रिपोर्ट आले तेव्हा डॉक्टरांना धक्काच बसला. कारण, जुळ्यांमधील मुलाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह तर मुलीचा रिपोर्ट निगेटीव्ह होता. याबाबत वडनगर मेडिकल कॉलेजचे अधीक्षक एचडी पालेकर यांचे म्हणणे आहे की, मुलांना ब्रेस्ट फीडिंग करण्यात आलेली नाही. दोघे सोबतच आहेत. अशावेळी रिपोर्ट वेगवेगळा असू शकत नाही. यासाठी दोन दिवसांनंतर बाळांचे पुन्हा सॅम्पल घेऊन तपासणी करण्यात येईल.

भावनगरमध्ये भाऊ-बहिणीला कोरोना

भावनगर जिल्ह्यात भाऊ-बहिणीला कोरोना झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. जेसर तालुक्यातील उगलवाण गावात राहणारा 6 वर्षांचा मुलगा आणि त्याची 7 वर्षांची बहिण यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. दोघांचा कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाशी संबंध आला होता. या रूग्णासोबत ते बसमधून सूरतहून एकत्र आले होते. त्यांना प्रथम समरस हॉस्टेलमध्ये क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. नंतर दोघांचे नमूने तपासणीसाठी पाठवले असता दोघेही पॉझिटीव्ह असल्याचे आढळले.