कोरोना : आरोग्य विमा उतरविण्यासाठी कंपन्याकडून दाखवलं जातं आमिष, पॉलिसी घेताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून ही परिस्थिती पाहता आकाशने मार्चमध्येच ५० लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण घेतले होते. त्याच्या काही दिवसांनंतर आकाशच्या शरीरात कोरोनाची लक्षणे दिसू लागली आणि त्याला एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले.

रुग्णालयात १५ दिवस उपचार सुरू होते. आकाशने जेव्हा या १५ दिवसांच्या क्लेमसाठी आपल्या विमा कंपनीला फोन केला तेव्हा समजले की, कोरोनाचा उपचार ५० लाखांच्या विमा योजनेत नव्हता. आकाशला यामुळे मोठा धक्का बसला होता. त्याला रुग्णालयाचे पैसे देण्यासाठी कशी तरी व्यवस्था करावी लागली. जर तुम्हाला आकाशसारख्या परिस्थितीत फसायचे नसेल, तर आरोग्य विमा करण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.

हेतू
सर्व प्रथम हे स्पष्ट असले पाहिजे की आरोग्य विमा पॉलिसी घेण्याचा हेतू काय आहे. सध्याच्या वातावरणात कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पॉलिसी करत असाल तर तुम्हाला अधिक सतर्क राहावे लागेल. पॉलिसी घेण्यापूर्वी कोरोना संसर्गाच्या उपचारांचा त्यात समावेश आहे की नाही हे जाणून घ्या.

मागील काही दिवसात भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) विमा कंपन्यांना अशी पॉलिसी तयार करण्यास सांगितले होते, ज्यात कोरोना विषाणूच्या उपचारांचा देखील खर्च असेल. यामुळेच बहुतेक कंपन्यांनी कोरोना विशेष विमा पॉलिसी देखील सुरू केली आहे. म्हणजे जर विमा पॉलिसीमध्ये कोरोनाचा उपचार कव्हर होत नाही, तर त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही.

योजनेची वैशिष्ट्ये नक्की पाहा
काहीवेळा आरोग्य योजनेची तुलना केवळ प्रीमियम दराच्या आधारे करणे योग्य नसते, कारण योजनेची वैशिष्ट्ये पाहणे देखील महत्वाचे असते. बर्‍याचदा सर्वात स्वस्त योजना मर्यादित संरक्षण देतात. प्रत्येक आरोग्य योजनेत समाविष्ट नसलेल्या गोष्टींची एक यादी असते, ज्या पॉलिसी कागदपत्रात नोंदवल्या जातात. आपण बर्‍याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या आरोग्य योजनेत कोणता खर्च समाविष्ट नाही हे माहित असावे, जेणेकरून क्लेम नाकारल्यावर आपली फसवणूक झाली आहे असे तुम्हाला वाटणार नाही.

काहीही लपवण्याची गरज नाही
असा एक सामान्य गैरसमज आहे की जर आपल्याला एखादा आजार असेल, तर आरोग्य विमा खरेदी करताना त्याबद्दल माहिती देऊ इच्छित नसतात. लोक असे करतात कारण त्यांना वाटते की, त्यांचा पॉलिसी अर्ज नाकारला जाईल किंवा प्रीमियमची रक्कम वाढेल. परंतु येथे हे लक्षात घ्या की, जेव्हा तुम्ही एखादा क्लेम करण्यास गेला आणि विमा कंपनीला हे कळले की तुम्ही काही माहिती लपवली आहे, तर तुमचा क्लेम नाकारलाही जाऊ शकतो. अशात आपल्या आरोग्याशी संबंधित सर्व महत्त्वपूर्ण तथ्य सांगितली पाहिजेत, कारण यामुळे प्रीमियमची रक्कम वाढेल पण तुमचा क्लेम नाकारला जाणार नाही.