सचिन तेंडूलकरचा ‘स्क्वेअर कट’ To ‘हेअर कट’ जोमात !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशात कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले असून वैद्यकीय सेवा पुरवणारी दुकाने, मेडिकल स्टोअर्स, रूग्णालये, किराणा मालाची दुकाने अशी काही मोजकी आस्थापनेच सुरु आहेत. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांची गैरसोय होताना दिसते आहे. सामान्य नागरिक तर सोडाच, पण खुद्द क्रिकेटच्या देवालादेखील घरच्या घरीच केशकर्तन करायची वेळ आली आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये सचिनने एका फोटोत हातात कात्री असल्याचा फोटो टाकला आहे, तर पुढील फोटोंमध्ये त्याने स्वत:चा कशापद्धतीने हेअरकट केला आहे, ते दाखवले आहे. सध्या त्याच्या या नव्या ‘सेल्फ-मेड’ लूकची जोरदार चर्चा होत आहे.

किकेटच्या मैदानात भल्याभल्या गोलंदाजांची पळता भुई थोडी करणार्‍या सचिनचा अपरकट आवडीचा शॉट होता. त्यानंतर आता कोरानामुळे लॉकडाउनमध्ये त्याने हेअरकट केल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. कोरोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे.

विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकार्‍यांच्या अथक परिश्रमामुळे काही प्रमाणात लोक कोरोनातून बरे होत आहेत. कोरोनामुळे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने यामध्ये आपला वाटा उचलत सरकारला 50 लाखांची आर्थिक मदत केली आहे. सध्या तो एका संस्थेमार्फत सुमारे 5000 लोकांच्या जेवणाखाण्याची जबाबदारीदेखील उचलत आहे.