COVID-19 : ‘सिंगर’ कनिका कपूरच्या अडचणीत वाढ, लखनऊ पोलीस करणार ‘चौकशी’

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड सिंगर कनिका कपूर कोरोनातून बरी झाल्यानंतर रविवारी(दि 5 एप्रिल 2020) सकाळी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. लखनऊचे पोलीस कमिश्नर सुजीत पांडे यांनी एका वृत्त वाहिनीला बोलताना सांगितलं की, “14 दिवसांचा क्वारंटाईन संपल्यानंतर लखनऊ पोलीस कनिका कपूरची चौकशी करणार आहेत. त्यांनी सांगितलं की, कनिकाविरोधात सरोजिनी नगर मध्ये आयपीसीमधील कलम 188, 269 आणि 270 नुसार एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यामुळं पोलिसांची टीम तिची चौकशी करेल.”

समोर आलेल्या माहितीनुसार, लखनऊचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी तक्रार केल्यानंतर सरोजिनी नगर ठाण्यात कनिकावर आयपीसीमधील कलम 188, 269 आणि 270 नुसार केस दाखल करण्यात आली होती. इतर दोन एफआयआर हजरतगंज आणि महानगर ठाण्यात दाखल करण्यात आली आहेत. यात सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन करणं आणि जाणून बुजून लोकांचा जीव धोक्यात घालणं अशा आरोपांचा समावेश आहे.

9 मार्च रोजी लंडनहून आली होती कनिका कपूर

कनिका कपूर 9 मार्च 2020 रोजी लंडनहून मुंबईत आली होती. यानंतर दोन दिवसांनी ती लखनऊला गेली होती. इथं तिनं पार्टी अटेंड केली होती. यावेळी ती 266 लोकांच्या संपर्कात आली होती. यांचाही शोध घेऊन कोरोना टेस्ट करण्यात आली. यातील 60 लोकांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटीव आला होता. 20 मार्च 2020 पासून कनिकावर उपचार सुरू होते.

गेल्या 17 दिवसांपासून ती रुग्णालयात भरती होती. कनिकावर उपचार सुरू असताना तिची अनेकवेळा कॉविड 19 टेस्ट झाली होती ज्यात सलग 5 वेळा तिचा रिपोर्ट पॉझिटीव आला होता. परंतु सहावा टेस्ट झाल्यानंतर तिचे रिपोर्ट निगेटीव आले ज्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.