राज्यात 10 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिले ‘गंभीर’ परिस्थितीचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्णांचे राज्य असणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आगामी काळात महाराष्ट्रातील परिस्थिती अधिक गंभीर बनू शकेल. त्यांनी असेही म्हटले की त्यांच्या सरकारने साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी प्रभावी काम केले आहे. राज्यात दररोज वीस हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत आणि शनिवारी संक्रमित लोकांची संख्या 10 लाखांपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात आत्तापर्यंत 29 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनावर नियंत्रण ठेवण्याच्या कडक उपायांचा संदर्भ देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “सामाजिक सुरक्षित अंतर पाळण्याच्या नियमांचे पालन करण्यासाठी राज्य सरकार काही कठोर पावले उचलू शकते.” ठाकरे म्हणाले, “लोकांनी आपली जबाबदारी स्वीकारून सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.”

मुख्यमंत्र्यांनी 15 सप्टेंबरपासून राज्यभरात घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्याची घोषणा करताना लोकांना यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. ते म्हणाले की ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांची माहितीही या मोहिमेमध्ये गोळा केली जाईल. ते म्हणाले की हे सर्वेक्षण महिन्यातून दोनदा केले जाईल.

आपल्या 40 मिनिटांच्या भाषणात ठाकरे यांनी मराठा समाजाला आंदोलन न करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “मराठा समाजाने निषेध करु नये, कारण राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना आरक्षण देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. जेव्हा सरकार तुमच्या मागण्या ऐकत नाही तेव्हाच निषेध न्याय्य ठरतो.”