Coronavirus : प्रवासापेक्षा घर आणि रेस्टॉरंटमध्ये वेगानं फोफावतोय ‘कोरोना’ ?, संशोधनातून मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    कोरोना महामारी पुन्हा एकदा वेगानं पसरताना दिसत आहे. देशातील बाधितांचा आकडा हा 81 लाखांच्या पुढं गेला आहे. दिल्लीतही कोरोनानं कहर केला आहे. इतकंच नाही तर ब्रिटनमध्ये कोरोना वाढता संसर्ग पाहता लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. ज्या वेगानं कोरोना पसरत आहे ते पाहता संशोधक आता कोरोना प्रसाराची कारणं शोधण्यासाठी संशोधन करत आहेत.

नुकतंच एक संशोधन करण्यात आलं आहे ज्यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. जर्नल मॉर्बिडिटी एंट मॉर्टेलिटी वीकली रिपोर्टमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कोरोना व्हायरस बंद जागेत वेगानं पसरतो. त्यामुळं व्हायरसचा प्रसार वेगानं होऊन संसर्ग होतो. या संशोधनानुसार, कोरोना काळात बाहेर जेवण करणं, सामान विकत घेणं, विमानानं प्रवास करण्याच्या तुलनेत धोकादायक ठरू शकतं.

या संशोधनातून काय सिद्ध झालं ?

या संशोधनासाठी अमेरिकेतील 101 कुटुंबाचं परिक्षण करण्यात आलं होतं. यात असं दिसून आलं की, बंद घराच्या आत कोरोनाचा प्रसार वेगानं होत आहे. या संशोधनादरम्यान 51 टक्के लोक कोरोनानं संक्रमित होते. त्यांना घरातल्या घरातच कोरोनाची लागण झाली होती. याचं कारण म्हणजे निष्काळजीपणा होतं असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

हॉटेलमध्ये खाणं कितपत सुरक्षित ?

संशोधकांचा दावा आहे, की कोरोना काळात बाहेर जेवण करणं, सामान विकत घेणं, विमानानं प्रवास करण्याच्या तुलनेत धोकादायक ठरू शकतं. अमेरिकेतील हावर्ड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या वैज्ञानिकांद्वारे करण्यात आलेल्या एका अभ्यासात स्पष्ट करण्यात आलं, की विमानांमध्ये व्हेंटीलेशन सिस्टीम व्यवस्थित असल्यामुळं हवा नेहमी शुद्ध राहते. परिणामी संक्रमणाचा धोका कमी होतो. याउलट व्हेंटीलेशन सिस्टीम व्यवस्थित नसेल तर कोरोनाचं संक्रमण वेगानं पसरू शकतं. तसंच हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये जास्त लोकांसह बसून जेवणं करणं देखील धोकादायक ठरू शकतं. किराणा सामान घेण्यासाठी दुकानात जास्त वेळ थांबल्यास गर्दी झाल्यानं कोरोनाचा धोका वाढू शकतो.

अमेरिकेतील मॅसाचुसेट्स इन्स्टिट्युट टेक्नॉलॉजी (एमआयटी) च्या अर्नोल्ड आय बार्नेट यांसह इतर संशोधकांनी सांगितलं, की एचईपीए फिल्टर विमानांमध्ये योग्य पद्धतीनं काम करत नाहीत. त्यामुळं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. भारतातील एमआयटीच्या एका तज्ज्ञांनी सांगितलं, की कोरोनाच्या संक्रमणाबाबत अजूनही स्पष्टपणे काही सांगता येत नाही. संसर्गापासून बचावासाठी साफ-सफाई, सोशल डिस्टेंसिंग, सॅनिटायजेशन या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं.

या संशोधनात लहान मुलं आणि वयस्कर मुलांबाबतही अनेक गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. यातून असं समोर आलं आहे की, लहान मुलं, वयस्कर लोक, नकळतपणे संक्रमण पसरवू शकतात. त्यामुळं अधिक लक्ष द्यायला पाहिजे. सरकारच्या गाईडलाईन्सचं पालन करून मास्कचा वापर करायला हवा, सोशल डिस्टेंसिंग पाळायला हवं. याशिवाय वैयक्तिक स्वच्छतेसह घराच्या साफ सफाईकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.