सरकारी सेवेमधील महिला कर्मचाऱ्यांसाठी ST च्या विशेष फेऱ्या सुरु होणार : अनिल परब

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक अजूनही पूर्णपणे सुरु झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रचंड यातना सहन कराव्यात लागत आहे. मुंबई उपनगरात राहणाऱ्या बऱ्याच लोकांचा वेळ तर बसची वाट बघण्यातच जात आहे. याचा सर्वात जास्त त्रास महिलानां होत आहे. आता सरकारी सेवेतल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी एस.टी. महामंडळ विशेष फेऱ्या सुरू करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून करण्यात आली आहे.

मुंबईत लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांना प्रवासासाठी खूप हाल सहन करावे लागत आहे. त्यामध्ये सरकारकडून ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचं प्रमाण वाढवण्यात आले आहे. त्यामुळे व्यवस्थेवरचा ताण वाढणार आहे. व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी महिलांसाठी या फेऱ्यांची सुरु करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून ही सेवा सुरु करण्यात येणार आहे.अनिल परब पुढे म्हणाले, आम्ही एसटी बस सेवा पुर्ण क्षमतेने सुरू केली आहे. तसेच मास्क आणि सॅनिटायझर लावणे बंधनकारक केले आहे. सुरक्षा ठेवूनच एसटी प्रवास सुरु करण्यात आला आहे.

एसटी महामंडळ अगोदरच तोट्यात होते. आणि कोरोनाच्या संकटात ते अधिकच तोट्यात गेले. त्यामुळे आता एसटी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून अतिरिक्त निधी मागण्यात आला आहे. लवकरच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार येतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांशी बोलूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. राज्य चालवत असताना आम्ही लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊनच सगळे निर्णय घेत असतो. त्यामुळे लोकल सेवा सुरू केली आणि त्यामुळे आणि पूर्वी प्रमाणे लोकांची गर्दी झाली आणि दूर्दैवाने पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढलाआणि त्यामध्ये कुणी दगावलं तर मनसे जबाबदारी घेणार आहे का ? त्यामुळे काळजी घेऊनच आम्ही लोकल सेवा सुरू करू असंही परब यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.