वाघोलीत कोविड-19 चाचणी केंद्र सुरु

वाघोली : वाघोली (ता.हवेली) येथील भारतीय जैन संघटना महाविद्यालयाच्या हॉस्टेल परिसरामध्ये कोरोना तपासणी करण्यासाठी कोरोना चाचणी केंद्र (स्वॅब सेंटर ) सुरु करण्यात आले आहे. यामुळे वाघोली व परिसरातील सशंयित रुग्णांना आता वाघोलीत चाचणी केली जाणार आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी वाघोलीत पॉजिटीव्ह सापडलेल्या एका रुग्णाच्या कुटुंबातील तिघांचे स्वॅब घेण्यात आले.तर दिवसभरात एकूण आठ जणांचे स्वॅब घेण्यात आले. ते तपासणी साठी एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले आहेत.

वाघोली परिसरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना तपासणी करण्यासाठी संबंधितांना पुणे शहरामध्ये नायडू किंवा ससून हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येत होते.आता मात्र वाघोलीसह ग्रामीण भागात कोरोना तपासणी स्वॅब सेंटर व्हावे यासाठी लोकप्रतिनिधीकडून पाठपुरावा केला होता.आरोग्य यंत्रणा देखील यासाठी कार्यरत मोठ्या प्रमाणावर कार्यरत होती. या आगोदरच वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना स्वॅब घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मंगळवारी प्रत्यक्षात स्वॅब सेंटर सुरु करण्यात आले आहे.

याठिकाणी आरोग्य केंद्राचे पाच कर्मचारी असणार असून त्यांना पीपीई सुरक्षा कीट आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे.संशयित व्यक्तीचा स्वॅब घेतल्यानंतर त्यास रिपोर्ट येईपर्यंत त्यांना तेथे क्वाराटाइन करुन ठेवण्यात येणार आहे. वाघोलीसह शिरूर-हवेली तालुक्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.यावेळी वाघोलीच्या सरपंच वसुधंरा उबाळे,गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के,तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात,
जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके,शिवदास उबाळे,मारुती गाडे,गणेश सातव, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड, डॉ. नागसेन लोखंडे, नोडल अधिकारी माखरे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील कोरोना संशयित रुग्णांना पुण्यात रेडझोनमधील रुग्णालयात जावे लागते.त्यामुळे त्यांना तेथे लागण होण्याची शक्यता होती. त्यामुळे ग्रामीण भागात कोविड19 चाचणी केंद्र सुरु करण्याची मागणी सातत्याने केली होती. पूर्व हवेली मध्ये दोन ठिकाणी कोविड19 चाचणी केंद्र मंजूर करण्यात आली. त्यानुसार चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहे.