Coronavirus : राज्यातील 20 जिल्हयांची परिस्थिती गंभीर, अ‍ॅक्शन प्लॅन तयार करणार सरकार

पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक असून, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. बुधवारी त्यांनी देशातल्या ७ राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना संसर्ग स्थितीवर चर्चा केली. त्याच अनुषंगाने आता महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती असलेल्या २० जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी राज्य सरकार आता खास योजना तयार करत आहे.

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यासोबत सहभागी झालेल्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्याची स्थिती पंतप्रधानांसमोर मांडली. त्यावेळी पंतप्रधानांनी ‘महाराष्ट्र के लोग बहादुरिसे सामना करते है’ असं कौतुक केलं. कोरोनाचा प्रसार जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या २० जिल्ह्यात विशेष पथके नियुक्त करुन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी केल्यास देशाच्या कोरोना आकडेवारीवर परिणाम होईल, अशी सूचना करत त्यांनी चिंता व्यक्त केली.

पंतप्रधान यांनी म्हटलं की, देशात ७०० जिल्हे असून त्यातील ७ राज्यातील फक्त ६० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना संसर्गित रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्रातले २० जिल्हे आहेत ही चिंतेची बाब आहे. या जिल्ह्यांमधील कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी काळजी घ्या, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

यावेळी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती सांगितली. राज्यात लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांच्या घशातून दोन द्रव्य घेतले जातात. रॅपिड अँटीजेन चाचणी अहवाल नकारात्मक आला तर दुसरा घेतलेला द्राव्य आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठवला जातो. औषधांची उपलब्धता आहे, दररोज दीड लाखांपर्यंत चाचण्या वाढवीत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.