Corona Vaccine : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन की स्पुटनिक व्ही कोणती लस चांगली?, किंमत किती अन् कधी घ्यावी हे जाणून घ्या

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात 1 मेपासून 18 वर्षावरील लोकांना लसीकरण सुरु केले आहे. मात्र लशींचा तुटवडा असल्याने अनेक राज्यात लसीकरण उशिरा सुरु होणार आहे. दरम्यान कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लशी 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात देशात वापरल्या जात आहेत. आता रशियाची स्पुटनिक व्ही लसदेखील वापरली जाणार असून या सर्व लशी प्रभावी असल्याचे चाचण्यात आढळले आहे. जी लस मिळेल, ती घ्या आणि कोरोनाची तीव्रता कमी करा, असा सल्ला शास्त्रज्ञ देत आहेत. या तीनपैकी कोणती लस चांगली, त्याचे किती डोस आणि किती कालावधीने घ्यावे. त्याची उपलब्धता अन् किंमत, साईड इफेक्टस जाणून घ्या.

सर्वाधिक चांगली लस कोणती ? (Which is best Vaccine?)

कोव्हॅक्सिन ही भारत बायोटेक आयसीएमआर आणि एनआयव्ही या संस्थांनी आपल्याच देशात तयार केलेली लस आहे. कोविशिल्ड ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेली लस पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीत उत्पादित केली जात आहे. 1 मे रोजी रशियातून स्पुटनिक व्ही लसदेखील भारतात दाखल झाली आहे. ही लस मॉस्कोच्या गामालेय रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिऑलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या संस्थेने विकसित केली आहे. स्पुटनिक व्ही या लशीला भारतासह 60 हून अधिक देशांत मान्यता मिळाली आहे.कोविशिल्ड ही जगात सर्वांत लोकप्रिय असलेली लस असून, सर्वाधिक देशांत ती वापरली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या लशीला मान्यता दिली आहे. कोव्हॅक्सिन ही लस केवळ भारतातच वापरली जात असून, कोरोनाच्या म्युटंट स्ट्रेन्सवरही ती प्रभावी ठरल्याचे आढळले आहे. त्यामुळे या तिन्ही लशी चांगल्या आहेत.

या लशी कशा विकसित केल्या? (How did these vaccines evolve?)

कोव्हॅक्सिन ही लस पारंपरिक इनअ‍ॅक्टिव्हेटेड प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. म्हणजेच यातून मृत व्हायरस शरीरात सोडला जातो. त्यातून अँटीबॉडी प्रतिसादाला चालना मिळते.विषाणू ओळखून त्याला विरोध करण्यासाठी अँटीबॉडी तयार केल्या जातात. कोविशिल्ड हे व्हायरल व्हेक्टर व्हॅक्सिन आहे. चिम्पांझीमध्ये आढळणाऱ्या ChAD0x1 या अ‍ॅडेनोव्हायरसचा वापर करून ही लस तयार केली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूप्रमाणे दिसणारे स्पाइक प्रोटीन तयार होते. त्यामुळे ते शरीरात गेल्यावर संरक्षणक्षमता जागृत होते. स्पुटनिक व्ही देखील व्हायरल व्हेक्टर व्हॅक्सिनच आहे. फक्त ते दोन विषाणूंच्या साह्याने विकसित केले आहे. या लशीचे दोन्ही डोसेस वेगवेगळे असतात. कोव्हॅक्सिन अन् कोविशिल्ड या लशींचे दोन्ही डोसेस सारखेच असतात.

किती डोस अन् किती कालावधीने घ्यावी (How many doses and for how long?)

कोव्हॅक्सिन या लशीचे 2 डोस 4 ते 6 आठवड्यांच्या अंतराने घ्यावेत. कोविशिल्डच्या दोन डोसेसमध्ये 6 ते 8 आठवड्याचे अंतर असावे. तसेच स्पुटनिक व्ही या लशीच्या दोन डोसेसमध्ये 3 आठवड्याचे अंतर असावे. भारतात सुरुवातीला कोविशिल्डच्या दोन डोसेसमध्ये चार ते सहा आठवड्यांच अंतर ठेवले जात होते. परंतु, चाचण्यांमध्ये असे लक्षात आले की या लशीच्या दोन डोसेसमध्ये आणखी जास्त दिवसांचे अंतर ठेवल तर ते अधिक प्रभावी ठरते. या तिन्ही लशी भारतातल्या उपलब्ध सुविधांमध्ये साठवता येतात.

लशी किती प्रभावी आहे? (How effective is the vaccine?)

या तिन्ही लशी प्रभावी असून WHO ने ठरवून दिलेले सर्व निकष त्या पूर्ण केल्या आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कोविशिल्ड लशीची चाचणी संपली. ती 70 टक्के प्रभावी आहे. तसेच 2 डोसमधील अंतर वाढवले आहे. तर तिचा प्रभाव आणखी वाढत असल्याचे आढळले आहे. ही लस गंभीर लक्षणांपासून बचाव करते आणि बर होण्याचा कालावधी कमी करते. कोव्हॅक्सिन या लशीच्या चाचण्या याच वर्षी झाल्या. एप्रिल महिन्यात या लशीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निष्कर्ष हाती आले आहेत. त्यानुसार ही लस 78 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. तसेच गंभीर लक्षण आणि मृत्यू रोखण्यास ही लस 100 टक्के प्रभावी असल्याचे आढळले आहे. स्पुटनिक व्ही ही रशियन लस सर्वांत जास्त म्हणजे 91.6 टक्के प्रभावी ठरत असल्याचे आढळले आहे.

या लशींचा प्रभाव किती दिवस राहतो ? (How long does the effect of these vaccines last?)

लसीचा प्रभाव किती दिवस राहतो याबद्दल ठोस सांगता येणार नाही. तरीही काही शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे, की किमान 9 ते 12 महिन्यांपर्यंत या लशींचा प्रभाव टिकून राहतो. यात काही शंका नाही. फायझर कंपनीकडून अलीकडेच एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार त्या कंपनीच्या लशीचा तिसरा डोस कदाचित वर्षभराने घ्यावा लागतो. एकंदरीत विचार केला, तर लशींचा प्रभाव किती काळ टिकेल, याबद्दल ठोस काही सांगता येणे अवघड आहे. सध्याच्या परिस्थितीत मात्र त्या नक्की प्रभावी आहेत.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट्सवर या लशी किती प्रभावी आहेत? (How effective are these vaccines on newer variants of the corona?)

जगातल्या अनेक देशांमध्ये आता कोरोना विषाणूच्या नव्या, म्युटंट स्ट्रेन्स आढळत आहेत. ब्रिटनमध्ये केंट स्ट्रेन आहे. भारतात डबल म्युटंट स्ट्रेन आहे. हा स्ट्रेन ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतल्या स्ट्रेनच्या संगमातून नव्याने तयार झाली आहे. काही देशांत ट्रिपल म्युटंट विषाणूही आढळला आहे. या म्युटंट्समुळे शास्त्रज्ञांची डोकेदुखी वाढली आहे. आतापर्यंतच्या संशोधनात असं आढळलं आहे, की कोव्हॅक्सिन ही लस सर्व प्रकारच्या म्युटंटवर प्रभावी ठरत आहे. कोविशिल्ड आणि स्पुटनिक व्ही या लशींबद्दलच्या संशोधनातून अशा प्रकारचा कोणताही दावा आतापर्यंत करण्यात आलेला नाही. तरीही शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की आपल्याकडे जी कोणती लस उपलब्ध होईल, ती घ्यावी. त्याद्वारेच आपण नव्या म्युटंट स्ट्रेनचा प्रसार रोखू शकतो.

उपलब्धता अन् किंमत (Availability and price)

कोव्हॅक्सिन कोविशिल्ड, स्पुटनिक व्ही या लशी लवकरच खुल्या बाजारातही उपलब्ध होणार आहेत. सिरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड ही लस सरकारी हॉस्पिटल्सना 300 रुपये प्रति डोस या दराने, तर खासगी हॉस्पिटल्सना 600 रुपये प्रति डोस या दराने देणार देणार आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस थोडी महाग आहे. ती राज्य सरकारांना 400 रुपये प्रति डोस या दराने, तर खासगी हॉस्पिटल्सना 1200 रुपये प्रति डोस दराने उपलब्ध होणार आहे. स्पुटनिक व्ही लस विकसित करणाऱ्या संस्थांपैकी एक असलेल्या RDIF चे प्रमुख दिमित्रेव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार या लशीच्या एका डोसची किंमत 10 डॉलर म्हणजे सुमारे 700 रुपये असेल. सरकार आणि खासगी हॉस्पिटल्सना ही लस किती रुपये दराने उपलब्ध होणार, हे अद्याप कंपनीने जाहीर केले नाही. अर्थात हे सगळ असल तरी तुम्ही कुठे लस घेताय आणि त्या राज्यात सरकारी धोरण नेमक काय आहे. यानुसार तुम्हाला लशीची किंमत मोजावी लागेल. आतापर्यंत 24 राज्यांनी असे जाहीर केले आहे की 18 वर्षांवरच्या वयोगटासाठी लस मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या लशींचे साइड इफेक्ट्स कोणते आहेत? (What are the side effects of these vaccines?)

तिन्ही लशीचे साइड-इफेक्ट्स सारखेच आहेत. या लशी इंट्रामस्क्युलर असल्याने स्नायूत खोलवर टोचाव्या लागतात. त्यामुळे लस जिथे दिली जाते, तिथे वेदना होतात आणि सूज येऊ शकते. सौम्य ताप, अंगदुखी, थोडी सर्दी अशी लक्षणं सर्वसामान्यपणे दिसू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास काळजीचे कारण नाही. डॉक्टरांशी चर्चा करून औषध घेतल्यावर बरे वाटेल.

कोणी लस घेऊ नये?

एखाद्याला काही खाद्यपदार्थाची किंवा औषधांची अलर्जी असेल, तर त्यांनी थेट लस घेऊ नये. आधी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी आणि त्यांच्या सल्ल्यानंतरच लस घ्यावी. तसंच, लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर काही गुंतागुंत निर्माण झाली, तर दुसरा डोस डॉक्टरांशी चर्चा करण्यापूर्वी घेऊ नये. ज्यांनी मोनोक्लोनल अँटीबॉडी किंवा प्लाझ्मा थेरपी घेतली असेल, त्यांनीही सध्या लस घेऊ नये. ज्यांच्या शरीरात प्लेटलेट्सच प्रमाण कमी आहे किंवा ज्यांनी स्टेरॉइड ट्रीटमेंट घेतली आहे, त्यांनी लस घेतल्यानंतर वैद्यकीय निरीक्षणाखाली राहावे, असा सल्ला दिला जात आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे तरुण, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांनीही लस न घेण्याची शिफारस केली आहे. तसेच ज्यांना कोरोनाची लक्षण दिसत आहेत किंवा कोरोनातून पूर्ण बरे झालेले नाहीत, अशा व्यक्तींनीही लस घेऊ नये. वैद्यकीय सल्ल्यानंतरच लस घ्यावी.