‘राज ठाकरे म्हणजे कोरोना काळात राजकारण न करता महाराष्ट्रातील जनतेच्या मागे उभा असलेला एकमेव ‘राजा’ माणूस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दररोज लाखांच्यावर रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने केंद्र सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सोमवारी (दि.19) घेतला. याअंतर्गत देशातील 18 वर्षावरील प्रत्येकाला लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. लसीकरणाचा पुढचा टप्पा 1 मेपासून सुरु होत आहे. केंद्राने राज्ये, खासगी रुग्णालये, औद्योगिक आस्थापनांना थेट निर्मार्त्यांकडून लस खरेदी करण्यास मुभा दिली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागत केले आहे. दरम्यान, दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मात्र या निर्णयानंतर राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे. केदार शिंदे यांनी ट्विट करुन राज ठाकरेंचे कौतुक केले आहे.

राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केलेल्या मागण्या मान्य झाल्याचे केदार शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. राज ठाकरे, आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या. अपुनने एकही मरा लेकीन सॉलिड मारा के नाही ? असं केदार शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच राज यांचा उल्लेख करताना, या काळात राजकारण न करता महाराष्ट्राच्या जनतेच्या मागे उभा असणारा एकमेव ‘राजा’ असा उल्लेख केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून हाफकीन सारख्या संस्थेला लस निर्मिती करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केली, असे ट्विट राज ठाकरे यांनी केलं होतं. यासाठी मी पंतप्रधानांचा आभारी असून केंद्र सरकार या महामारीवर मात करण्यासाठी कायमच सहाय्य करेल, असी आशाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती.