Coronavirus Vaccine : डिसेंबरपर्यंत भारताला मिळेल ‘मेड इन पुणे’ कोरोना वॅक्सीन, ‘सीरम’चा दावा

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूच्या लसीची चाचणी जगभर सुरू आहे. दरम्यान भारतासाठी एक चांगली बातमी आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांचे म्हणणे आहे की, या वर्षाच्या अखेरीस देशाला कोरोना लस मिळेल. सीरम संस्था जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाबरोबरही सीरम इन्स्टिट्यूटने लस उत्पादनाचा करार केला आहे.

एका मुलाखतीत पुनावाला म्हणाले की, त्यांची कंपनी डिसेंबरच्या सुरुवातीला कोविड-१९ ची लस लाँच करणार आहे. पूनावाला म्हणाले, ‘आम्ही दोन आठवड्यांत लसीची चाचणी सुरू करणार आहोत. आयसीएमआरच्या भागीदारीत ही चाचणी केली जाईल. ऑगस्टच्या अखेरीस आम्ही ही लस तयार करण्यास सुरु करू.’

७ ऑगस्ट रोजी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने लस संस्था GAVI आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनसह आपल्या भागीदारीची घोषणा केली होती. यांचे लक्ष्य भारताव्यतिरिक्त निम्न व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी १० कोटी डोसपर्यंतची लस वेगाने उपलब्ध करून देणे आहे.

GAVI ही एक लस संस्था आहे, जी कोवॅक्स फॅसिलिटीचे नेतृत्व करते. कोवॅक्स फॅसिलिटी (Covax Facility) संपूर्ण जगभरात कोविड-१९ लस जलद आणि निष्पक्ष मार्गाने पोहोचवण्यासाठी तयार केली गेली आहे. २०२१ च्या अखेरीस आपल्या सदस्य देशांपर्यंत लसीचे २०० कोटी डोस पोचवणे हे त्याचे लक्ष्य आहे.

बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने Gavi ला सुमारे ११ अब्ज रुपये गुंतवणूक फंडाच्या माध्यमातून दिले आहेत, ज्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला संभाव्य लस तयार करण्यास मदत होईल.

पूनावाला यांनी लसीच्या किंमतीवर स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, ‘आम्हाला ३ डॉलर (२२४ रुपये) वर याचा निधी मिळाला आहे, जी आमच्यासाठी एक खास किंमत आहे. परवाना मिळाल्यानंतर या लसीची किंमत थोडी जास्त होईल. लसीची अंतिम किंमत दोन महिन्यांत जाहीर केली जाईल.’

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. जगातील ६०-७० टक्के लसीचे उत्पादन येथेच केले जाते. सीरम संस्था १.५ बिलियन लसीचे डोस दरवर्षी तयार करते, ज्यात पोलिओ, डिप्थीरिया, टिटॅनस, पर्ट्यूसिस, हिब, बीसीजी, आर-हेपेटायटीस बी, गोवर, मम्प्स आणि रुबेला लसींचा समावेश आहे.

असा अंदाज आहे की, जगातील सुमारे ६५ टक्के मुलांना सीरम संस्थेने तयार केलेली किमान एक लस तरी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे आणि जगातील जवळपास १७० देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांमध्ये वापरली जाते.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भारतातील प्रथम क्रमांकाच्या बायोटेक्नॉलॉजी कंपनीचा दर्जा मिळाला आहे, जी अत्याधुनिक अनुवंशिक आणि सेल-आधारित तंत्रज्ञान, अँटीसेरा आणि इतर वैद्यकीय वैशिष्ट्यांचा वापर करून जीवनरक्षण लस तयार करते.