Corona Vaccine : 1 मेपासून मेडिकलमध्ये मिळणार ‘कोरोना’ लस? किती असणार किंमत?; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – १ मेपासून खुल्या बाजारात कोरोना लसींची विक्री करण्याची परवानगी कंपन्यांना मिळाली आहे. देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला. असं असेल तरी १ मेपासून कोरोनाची लस मेडिकलच्या दुकानांमध्ये मिळणार नाही. त्यामुळे लस घेण्यासाठी लोकांना रुग्णालय किंवा लसीकरण केंद्रांमध्येच जावं लागेल.

कोरोना लसींचं उत्पादन करणाऱ्या बहुतांश कंपन्या एका डोसची किंमत ७०० ते १००० रुपयांच्या दरम्यान ठेऊ इच्छितात. सध्याच्या घडीला सरकारनं कोरोना लसीच्या एका डोसची किंमत २५० रुपये ठेवली आहे. खुल्या बाजारात कोविशील्ड लसीची किंमत प्रति डोस १ हजार रुपये इतकी असेल, असं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं आहे.

दरम्यान, लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचं पालन करूनच लसीकरण करावं लागलं. त्यामुळे कोरोना लस मेडिकलमध्ये मिळणार नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. लस घेतल्यानंतर कोणते प्रतिकूल परिणाम होतात, साईड इफेक्ट्स जाणवतात, त्याची नोंद कोविन ऍपवर ठेवली जाते. या माहितीचा अभ्यास केला जातो.

लवकरच देशात स्पुटनिक व्ही लस उपलब्ध होईल. स्पुटनिक व्ही लसीच्या निर्मितीसाठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजनं रशियन कंपनीसोबत करार केला आहे. ही लस कोवॅक्सिन आणि कोविशील्डपेक्षा जास्त प्रभावी आहे. स्पुटनिक व्ही लसीच्या एका डोसची किंमत ७५० रुपये असू शकते. मात्र याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही. कंपन्यांना खासगी बाजारपेठेत किती डोस विकण्याची परवानगी देण्यात येईल, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. याबद्दलचं चित्र स्पष्ट झाल्यावर किंमत निश्चित केली जाईल, असं उत्पादकांनी सांगितलं.