Coronavirus : श्रीमंत लोक गरज नसताना ICU बेड घेतात, आरोग्य मंत्र्यांनीच दिली धक्कादायक माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे संकट वाढत आहे अशा काळात खासगी, शासकीय दवाखान्यात रुग्णांना बेड देखील मिळत नाहीत, अशी परिस्थिती झाली आहे. मोठ्या हॉस्पिटलमध्ये अनेक श्रीमंत लोक स्वत:च्या आर्थिक ताकदीवर गरज नसताना ICU बेड घेत असल्याचे धक्कादायक वास्तव राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच सांगितले आहे. राज्यात अनेक ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, अनेकांचा कल खाजगी रुग्णालयाकडे आहे. खाजगी रुग्णालयात देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करत असल्याचं समोर आलं आहे.

अनेक गरजवंतांना आयसीयू व्हेंटिलेटर याची गरज असताना उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही श्रीमंत धनाढ्य लोकांवर नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिक लक्ष देत कारवाई करण्याच्या सूचना देखील केल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णवाढीचा वाढता आलेख कायम आहे. आज राज्यात तब्बल 17 हजार 433 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर गेल्या 24 तासात 292 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा हा आकडा चिंता वाढवणारा आहे. राज्यात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडल्यानं रुग्णसंख्या 8 लाख 25 हजार 739 इतकी झाली आहे. तर सध्या राज्यातील विविध रुग्णालयात 2 लाख 1 हजार 703 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.