Corona च्या पार्श्वभुमीवर तज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, म्हणाले – ‘दोन मास्क वापरा अन् कोरोनाला दूर ठेवा’

नवी दिल्ली, ता. १४ : पोलीसनामा ऑनलाइन : पुन्हा एकदा भारतात कोरोना व्हायरस प्रचंड वाढताना दिसत आहे. त्यामुळे लोकांना घरात बसणे बंधनकारक होत आहे. कोरोनाची दुसरी लाट देशात थैमान घालत असताना एकावर एक असे ‘दुहेरी मास्क’ वापरणे योग्यच आहे. संसर्ग दूर ठेवण्याचा हा योग्य मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनाची दुसरी लाट देशात थैमान घालत असताना हे ‘दुहेरी मास्क’ वापरणे योग्यच असून संसर्ग दूर ठेवण्याचा हा योग्य मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हल्ली सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर एक नव्हे, तर एकावर एक दोन मास्क लावलेल्या व्यक्ती दिसू लागल्या आहेत. हा कोरोना विषाणूपासून संरक्षण मिळवण्याचा प्रकार आहे की अनावश्यक देखावा, असा प्रश्नही पडला असेल.

‘गर्दीच्या ठिकाणी, सुरक्षित अंतर राखणे कठीण असताना, दुहेरी मास्क वापरणे योग्य आहे. अनेक मास्क चेहऱ्यावर योग्यरित्या बसत नाहीत, काही सैल असतात. अशावेळी दोन मास्क वापरल्याने संसर्गाची शक्यता कमी करता येईल,’ असे ते म्हणाले. ‘एक सर्जिकल मास्क आणि त्यावर कापडी मास्क वापरता येईल. किंवा एकावर एक दोन कापडी मास्कही वापरणे योग्य आहे. एन ९५ मास्क वापरत असाल, तर मात्र दुसऱ्या मास्कची गरज नाही,’ असा सल्ला ‘दिल्लीज मॅक्स साके’च्या इंटर्नल मेडिसीन विभागाचे डॉ. रोमेल टिकू देतात.

मात्र, काही तज्ज्ञांच्या मते ही योग्य पद्धत नाही. ‘मास्कला छिद्र असेल, तर उपाय म्हणून दुहेरी मास्क वापरणे योग्य. मात्र ही सरसरकट पद्धत असू शकत नाही. योग्य पद्धतीने घातलेला एक मास्क तुम्हाला चांगले संरक्षण देतो,’ असे मत बेंगळुरूच्या अपोलो स्पेशालिटी रुग्णालयाचे फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र मेहता यांनी व्यक्त केले. दुहेरी मास्क सुरक्षित असल्याबाबत कोणताही शास्त्रीय अभ्यास झाला नसून एन-९५ मास्क किंवा तीन पदरी कापडी मास्क पुरेसा आहे, असे डॉ. व्ही. रवी यांनी सांगितले. दुहेरी मास्क वापरल्याने अधिक चांगले संरक्षण मिळू शकते, असे कोलकात्याच्या बेल व्ह्यू क्लिनिक येथील वैद्यकीय सल्लागार राहुल जैन यांनी सांगितले. मास्क चेहऱ्यावर नीट बसला नसेल. इलॅस्टिक सैल झाले असेल, अशा वेळी दुहेरी मास्क उपयुक्त ठरतो.