गोमुत्र पिल्यानं ‘कोरोना’पासून दूर रहाल असा दावा करणाऱ्या भाजप मंत्र्याला Covid-19 ची लागण ! रुग्णालयात दाखल

कोलकाता : वृत्तसंस्था –   गोमुत्र प्यायल्यानं कोरोनाच्या संसर्गापासून दूर रहाल असा दावा करणाऱ्या भाजप मंत्र्यांचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप अशी प्रचाराला रंग आली असताना कोरोनाच्या संसर्गाबाबत बंगालच्या भाजप अध्यक्षांनी अजब दावा केला होता. गोमुत्र घेतल्यानं संसर्गाचा धोका कमी होतो असा दावा त्यांनी केला होता. दिलीप घोष असं त्यांचं नाव आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

दिलीप घोष यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घोष यांना जास्त ताप येत होता. त्यामुळं त्यांनी कोरोनाची चाचणी केली. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप घोष यांना 102 एवढा ताप होता. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य असल्यानं चिंता करण्याचं काहीही कारण नाही असंही डॉक्टर म्हणाले आहेत.

घोष यांना 2 दिवसांपूर्वीच तब्येत खराब असल्यानं अस्वस्थ वाटत होतं. त्यांनी कोरोना चाचणी केली आणि त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष घोष कोरोना विषाणुच्या संसर्गाबद्दल वादग्रस्त वक्तव्यांवरून अनेक वेळा चर्चेचा विषय ठरले. यापूर्वी त्यांच्याच एका वक्तव्यात ते म्हणाले होते की, गोमुत्र पिण्यामुळं कोरोना विषाणुसह सर्व प्रकारच्या विषाणूंविरुद्द लढा देण्यास शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.