जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मोफत 60 बेडचे कोविड केंद्र केले सुरू – जि. प. अध्यक्ष सुभाष पवार

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – मुरबाड तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि तिसरी लाट लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषदेने शिवळे येथे ६० बेडचे कोविड केअर केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचे उद्घाटन हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी बांधकाम व आरोग्य समिती जी. प. ठाणे अध्यक्ष कुंदन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनीष रेंगे, जी. प. सदस्य ठाणे रेखा कंटे, शिवसेना मुरबाड शहर अध्यक्ष राम दुधाळे, पंचायत समिती सदस्य अनिल देसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ठाणे जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष सुभाष पवार म्हणाले की कोव्हिडं केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून, लगेचच रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात मुरबाड तालुक्यात रुग्णांची संख्या कमी होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात मुरबाड शहराबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत होते. त्याच प्रमाणे तिसऱ्या लाटेचा विचार करून नागरिकांची गैर सोय होऊ नये या अनुषणगाने कोव्हिडं केअर सेंटर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत चालू करण्यात येणार असून या कोव्हिडं केअर सेंटर वर माझे पूर्ण लक्ष असणार असल्याचे सांगितले. मुरबाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर कोविड केंद्र उभाले असून तालुक्यातील नागरिकांनी आजारावर दुर्लक्ष न करता कोव्हिड ची लक्षणे आढळल्यास कोव्हिडं केअर सेंटर मध्ये दाखल व्हावे जेणे करून आपल्या पासून कोणी संक्रमित होणार नाही.

शिवळे येथील शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालयातील मुलींच्या वस्ती गृहात ६० बेडचे कोविड केअर केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्रात रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास रुग्णांना ऑक्सिजन पुरवठाही केला जाईल. या केंद्रासाठी जिल्हा परिषदेकडून डॉक्टर, नर्स यांच्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी दिली.