लपवाछपवी ! गुजरातमध्ये दिवसाला 1744, तर 71 दिवसांत सव्वालाख लोकांचा मृत्यू

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वच राज्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे गुजरातमध्ये आरोग्य व्यवस्थेची दाणादाण उडाल्यासारखी परिस्थिती आहे. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारने सारवासारव केली. परंतु गुजरात मधील एका दैनिकांने केलेल्या मृत्यूंच्या पडताळीतून धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. गुजरातमध्ये दिवसाला 1744 लोकांचा मृत्यू होत असून, अवघ्या 71 दिवसात 1 लाख 23 हजारांहून अधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने एवढे मृत्यूप्रमाणपत्र वाटले असताना राज्यात 4 हजार 218 मृत्यू झाले असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

गुजरात मॉडेलबद्दल शंका वाटते

देशात गुजरात मॉडेलची चर्चा सुरु असताना ही माहिती समोर आल्याने याला आदर्श मॉडेल म्हणायचे का असा विचार करावा लागत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (शुक्रवार) गुजरात मॉडेलबाबत शंका वाटत असल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी गुजरातमधील काही वृत्तपत्रांचे कात्रण पोस्ट करुन गुजरात मॉडेलबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. गुजरातमध्ये 71 दिवसांत 1.23 लाख मृत्यू झाले आहेत. याचा अर्थ दिवसाला 1744 मृत्यू झाले आहेत. यामुळे या मॉडेलची जेवढी चर्चा झाली त्यापेक्षा तेथील कामगिरी निश्चितच योग्य नाही असे संख्येवरुन दिसून येते.

धक्कादायक माहिती उजेडात

गुजरातमधील एका दैनिकाने राज्यातील मृतांच्या आकडेवारीबद्दल विशेष वृत्त प्रसिद्ध केले आहे. 1 मार्च 2021 ते 10 मे 2021 या कालावधीत राज्यात वाटप करण्यात आलेल्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आकडेवारीची पडताळणी करण्यात आली. यातून डोळे विस्फारून टाकणारी माहिती उजेडात आली आहे. 33 जिल्हे आणि 8 महापालिकांद्वारे 71 दिवसांमध्ये 1 लाख 23 हजार 871 मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. तर विरोधाभास म्हणजे राज्यात केवळ 4 हजार 218 जणांचाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. त्यामुळे गुजरातमध्ये 71 दिवसात सव्वा लाख लोकांचा मृत्यू कशामुळे झाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पृथ्वीराज चव्हाणांनी साधला निशाणा

या मुद्यावरुन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. हे भयंकर आहे ! 71 दिवसांत 1.23 लाख मृत्यू. दररोज 1,744 मृत्यू. गुजरात मॉडेल नेहमीच माहिती लपवून ठेवतं आणि अहवालात छेडछाड करण्याचंच काम करते, असे चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.