10 जिल्हयात ‘कोरोना’मुळं होतायेत 70 % मृत्यू, देशभरात आतापर्यंत 15301 जणांचा गेला बळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. हजारो लोक या प्राणघात विषाणूच्या विळख्यात सापडत आहेत. दर 14 ते 16 दिवसांनी कोरोनाची प्रकरणं दुप्पट होत आहेत. विशेष म्हणजे देशातील 720 पैकी 407 जिल्ह्यांमध्ये कमीत कमी एकतरी मृत्यू होत आहे. परंतु देशभरात होणाऱ्या मृत्यूपैकी 70 टक्के मृत्यू केवळ 10 जिल्ह्यांमध्ये होत आहेत.

सतत वाढतोय मृतांचा आकडा
एक महिन्यापूर्वी देशातील 272 जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे कमीत कमी एका रुग्णाचा मृत्यू होत होता. मात्र आता 348 जिल्ह्यांमध्ये किमान एकातरी रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त येत आहे. एक महिन्यापूर्वी 50 असे जिल्हे होते त्यात किमान एक मृत्यू झाला. 30 दिवसांपूर्वी 145 जिल्ह्यांमध्ये किमान एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र आता या सर्व जिल्ह्यांमध्ये किमान एकतरी मृत्यू होत आहे.

 

महाराष्ट्रात लहान शहरांमध्ये वाढतेय संख्या
कोलकाता, इंदूर आणि जयपूरसारख्या मोठ्या शहरांच्या तुलनेत महाराष्ट्रातील औरंगाबाद, सोलापूर आणि नाशिकसारख्या काही शहरांमध्ये मृतांचा आकडा वाढत आहे. महाराष्ट्रातील या शहरांमध्ये मृत्यूचे प्रमाण 6 ते 9 टक्क्यांच्या दरम्यान आहे. इतकेच नाही तर गेल्या एका महिन्यात गुडगाव, फरीदाबाद आणि गाझियाबादमध्येही मृत्यूचे प्रमाण दिसून आले आहे.

मृत्यू दर वाढला
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, हरयाणा, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम आणि पंजाबमध्ये गेल्या दोन आठवड्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. देशात मृत्यूचे प्रमाण 2.8 टक्यावरून 3.2 टक्यापर्यंत वाढले आहे. परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 47 टक्क्यांवरून 57 टक्क्यांवर पोहचले आहे. मागील तीन आठवड्यांत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे.