बाणेर-बालेवाडी येथे 100 ‘बेड’चं कोव्हीड हॉस्पीटल लवकरच सुरू होणार, स्थायी समितीमध्ये खर्चाला मान्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पंचशील फाउंडेशनच्यावतीने सीएसआर फंडातून बाणेर – बालेवाडी येथील एका इमारतीत ४४ आयसीयु बेडस् आणि २७० ऑक्सीजन बेडस्चे तात्पुरते कोविड हॉस्पीटल उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात याठिकाणी १०० बेडस् वापरात आणण्यात येणार असून याठिकाणी डॉक्टर्स व अन्य स्टाफसह रुग्णांचे जेवण व अन्य व्यवस्थापकीय खर्चासाठी डॉ. भाकरे सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल ऍन्ड रिसर्च इन्स्टिट्यूटला महापालिकेच्यावतीने प्रत्येक बेडसाठी १४०० रुपये देण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

हेमंत रासने यांनी सांगितले, की बाणेर -बालेवाडी येथील एका इमारतीचे काम पुर्ण झाले आहे. या इमारतीमधील अकोमोडेशन रिझर्वेशनच्या माध्यमातून सुमारे ४२०० चौ.मी. क्षेत्रङ्गळाचा तळ मजला आणि आणि सहा मजल्यांची इमारत महापालिकेच्या ताब्यात येत आहे. याठिकाणी पंचशील ङ्गाउंडेशनच्यावतीने सीएसआर च्या माध्यमातून २७० ऑक्सीजन बेडस् आणि ४४ आयसीयु बेडस्चे हॉस्पीटल उभारण्याची तयारी दर्शविली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या इमारतीची पाहाणी केल्यानंतर हे हॉस्पीटल चालविण्यासाठी महापालिकेच्यावतीने डॉक्टर्स व अन्य स्टाफ तसेच अत्यावश्यक सुविधा पुरविण्यासाठी जंबो हॉस्पीटलचे काम पाहाणार्‍या पीएमाअरडीएकडून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविण्यात आले आहेत. यामध्ये डॉ. भाकरे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे दर हे प्रति बेड १४०० रुपये इतके आले आहेत. विशेष असे की सीईओपी येथे उभारण्यात येणार्‍या ८०० बेडस्च्या जंबो हॉस्पीटलसाठी हेच दर २ हजार रूपये इतका आहे. सुरवातीच्या काळात या नवीन इमारतीतील १०० बेडस् वापरात आणले जाणार आहेत. यासाठीचा खर्च महापालिका करणार असून त्याला आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे हेमंत रासने यांनी नमूद केले.