राज्यातील परिस्थिती चिंताजनक ! बेड नसल्यानं रूग्णांना खुर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ, उस्मानाबादमधील प्रकार

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यावर आलेले कोरोनाचे संकट आता आणखी गंभीर होताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून सुविधा अपु-या पडू लागल्या आहेत. दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातही दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णांना बेड मिळणे मुश्कील झाले आहे. बेड मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलच्या दारोदार फिरावे लागत आहे. अशातच बेड न मिळाल्याने रुग्णांना चक्क खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात ही घटना घडली आहे. व्हिडीओमध्ये बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना खूर्चीत बसवण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेच रुग्णांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसत आहे. यावेळी डॉक्टर आणि नर्स आपल्याला शक्य ती सर्व मदत रुग्णांना करण्याचा प्रयत्न करत आहेत. उस्मानाबादमध्ये रविवारी (दि. 11) 681 नव्या रुग्णांची नोंद झाली असून यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात सध्या 4300 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकांनी पुणे, पालघर, भंडारासहित उस्मानाबादमध्येही ऑक्सिजन पुरवठ्याचा तुटवडा असल्याचा उल्लेख केला आहे.