देशावरील संकट दूर करण्यासाठी एखादा मनमोहन सिंग अन् रुझवेल्ट हवा

पोलीसनामा ऑनलाइन : देशात कोरोनाने थैमान घातल्याने पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शेअर बाजारात दररोज याचे परिणाम दिसून येत आहेत. देशात सध्या निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेनेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष रुझवेल्ट यांनी घेतलेल्या निर्णयांकडे बोट दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला आहे. तसेच देशाला आज एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि वाढती बेरोजगारी यावर राऊत यांनी रोखठोक सदरातून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना खडेबोल सुनावले आहेत.

कोरोना संकटामुळे शेअर बाजाराची रोजच पडझड सुरू झाली आहे. आपल्याच देशात नाही, तर जगात एक भयानक मंदीची लाट आली आहे. भारतासारख्या देशात उत्पादनाचा वेग घटला आहे. लोकांनी नोटाबंदीच्या काळात नोकऱ्या गमावल्याच होत्या. आता लॉकडाऊनमध्ये उरलेल्या लोकांनीही नोकऱ्या गमावल्या. लोकांची पैसे खर्च करण्याची क्षमता संपली.अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. अशा संकटसमयी एखादा नवा मनमोहन सिंग निर्माण करून त्याच्या हाती देशाची अर्थव्यवस्था सोपवणे गरजेचे असल्याचे सांगत राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या अर्थमंत्रीपद दुसऱ्या व्यक्तीकडे देण्याचा सल्ला दिला आहे.

देशातील 60 टक्के कामगार बेकार झाले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न दोन तृतीयांशने खाली आले आहे, पण आपले राज्यकर्ते मात्र उदासीन आणि आत्मसंतुष्ट आहेत. काही महिन्यांत अनेक चांगले अर्थतज्ञ पंतप्रधान मोदींना सोडून गेले आहेत. 1929 मध्ये अमेरिकेतील वायदे बाजार कोसळला आणि तेथे एक भयानक मंदीची लाट आली. पण वर्षभर अगोदर तेंव्हाचे अध्यक्ष हुवर यांनी अमेरिकन काँग्रेसला पाठविलेल्या संदेशात मात्र देशात आबादीआबाद असल्याचे म्हटले होते. तेच राजकीय वातावरण आज भारतात आहे. इस्पितळे व राजकारण सोडले तर आपल्या देशात काहीच सुरू नाही. स्मशाने, कब्रस्तानेदेखील 24 तास सुरू आहेत. स्मशानांत लाकडांची टंचाई अन् कब्रस्तानात जमीन कमी पडत आहे. हे आबादीआबाद असल्याचे लक्षण नाही, असे राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री या दोघांनीही मंदीतून सावरण्यासाठी अर्थव्यवस्थेस उभारणी देण्यासाठी आपण नक्की काय करीत आहोत, यावर बोलायला तयार नाहीत. अमेरिकेत मंदी असताना तेंव्हाचे राज्यकर्ते आत्मसंतुष्ट होते, आत्मप्रौढीत मशगूल होते. 1930 च्या जूनमध्ये एक शिष्टमंडळ अध्यक्ष हुवर यांना भेटून परिस्थितीची कल्पना देण्यासाठी गेले, पण हुवर त्यांना म्हणाले, मित्रानो, तुम्ही दोन महिने उशिरा आलात. कारण मंदी दोन महिन्यांपूर्वीच संपली.वस्तुस्थिती मात्र तशी नव्हती, पण राजकारणी लोकांना दोष का द्यावा? वायदे बाजार कोसळण्याच्या काही दिवस अगोदर सर्व आलबेल असल्याची ग्वाही हॉर्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्र्ज्ञांच्या एका समितीने दिली होती. या अर्थशास्त्र्ज्ञांना वायदे बाजार कोसळणार व आर्थिक मंदी येणार याची कल्पना नव्हती. पुढे त्यांची संस्था बंद पडल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष हुवर आत्मसंतुष्ट होते. पण त्यांचे विरोधक प्रे. फ्रँकलिन रुझवेल्ट तसे नव्हते. त्यांनी सरकारी खर्चात कपात, उत्पादन वाढ आणि बेकार, निराश्रितांना सहाय्य असा कार्यक्रम मांडला अन् त्यावरच अध्यक्षीय निवडणूक जिंकली. अर्थात अमेरिकेच्या अर्थव्यवहाराला गती आणण्यासाठी त्यांना सरकारी खर्चात कपात न करता प्रचंड वाढ करावी लागली. रुझवेल्ट यांनी अमेरिकेतील अत्यंत हुशार, लोकहितदक्ष अशा बुद्धिमान लोकांचे वर्तुळ स्वतःभोवती जमवले. आपला नवा आर्थिक कार्यक्रम रुझवेल्ट जाहीर केला. रुझवेल्ट यांनी आकाशवाणीवरून त्यांची मन की बात मांडून अमेरिकन नागरिकांशी हितगुज केले. पुढे त्यांचे हितगुज म्हणजे मन की बात ही नित्याचीच झाली. रुझवेल्ट यांचे भाषण होताच अमेरिकन लोकांत एकदम विश्वास निर्माण झाला. नवे सकारात्मक वातावरण निर्माण झाले. लोकांना खात्री पटली की, प्रे. रुझवेल्ट यांचे सरकार हे केवळ गतिमान व पुरोगामीच नाही, तर आनंदी व आनंदवर्धक आहे. लोकांनी त्याचे प्रचंड स्वागत केले आणि आर्थिक मंदीचे रूपांतर अर्थव्यवस्था गतिमान होण्यात झाले आहे. अशाच प्रकारे आपल्या देशावरील संकट दूर करण्यासाठी एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा. प. बंगालच्या निवडणुका संपल्याने निदान पंतप्रधान मोदीनी आता रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून बाहेर पडून रुझवेल्टच्या भूमिकेत यावे. देशाला त्याचीच गरज असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.