‘कोरोना’च्या संसर्गाला वेग, ग्रामीण महाराष्ट्रानं वाढवली चिंता !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ग्रामीण आणि निम शहरी भागात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्यानं खूपच वेगानं कोरोनाचा प्रसार होत आहे. महाराष्ट्रासाठी ही चिंता वाढवणारी बाब आहे. राज्य सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार, 28 टक्के कोरोनाबाधित सध्या गाव आणि निम शहरी भागात सापडत आहेत. बहुतांश मृत्यू हे याच भागात होत आहेत. शुक्रवारपर्यंतच्या 7.3 लाख केसेस पैकी 2 केसेस या खेड्यांमधील आणि तालुक्यातील आहेत. तर उर्वरीत 5.3 लाख केसेस 27 महापालिका क्षेत्रातील आहेत.

23,444 या मृतांच्या आकडेवारीपैकी 23 टक्के म्हणजेच 5500 मृत्यू हे ग्रामीण भागातील आहेत. उर्वरीत 17,944 मृत्यू हे महापालिका क्षेत्रातील आहेत. बीड, उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव आणि इतर जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड कहर आहे.

कोल्हापूरबद्दल बोलायचं झालं तर महापालिका हद्दीच्या तुलनेत ग्रामीण भागात दुप्पट केसेस आहेत. शुक्रवारपर्यंत महापालिका हद्दीत 6064 केसेस होत्या. तर ग्रामीण भागातील केसेस 14,255 एवढ्या आहेत. जिल्ह्यातील 1024 पैकी 841 खेड्यात सध्या कोरोनाचे रुग्ण आहेत.

रुग्णांचा रस्त्यातच किंवा रुग्णालयात आणताच मृत्यू

नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या मते 25 टक्के रुग्ण हे मृतावस्थेतच रुग्णालयात आणले जात आहेत. तर काही जणांचा रस्त्यातच मृत्यू होतो. काही जण 5 तसांवर असलेल्या अकोल्याहून येतात. बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये खासगी क्षेत्रानंही राज्य सरकारला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ अभय बंग यांच्या मते ग्रामीण भागात संक्रमण वाढणं अपेक्षित होतं. परंतु गंभीर रुग्णांचं प्रमाण वाढणं ही मात्र चिंतेची बाब आहे. सध्या बंग गडचिरोलीत आहेत. गडचिरोलीत सध्या 800 च्या आसपास केसेस आहेत. परंतु या केसेस ग्रामीण भागातून येताना दिसत आहेत. डॉक्टरांनी आतापर्यंत चांगलं काम केलं आहे. परंतु चाचणी क्षमता अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळं संसर्ग आणि मृत्यू दोन्हीमध्ये वाढ आहे असं ते म्हणाले. स्थानिक ठिकाणी अनेक मृत्यूंची नोंद केली जात आहे. त्यामुळं या भागात आजाराचं अचूक प्रमाण दिसत आहे. देशातील 60 ते 70 टक्के जनता ग्रामीण भागात राहते. त्यामुळं स्क्रीनिंगसाठी ग्रामीण भागात तातडीनं व्यवस्था करणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं.

अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळं मृत्यू वाढत असल्याचं सरकारला मान्य नाही. जरी केसेस वाढत असल्या तरी गंभीर रुग्णांचं प्रमाण मात्र कमी आहे असं वैद्यकीय अधिकारी आणि डॉ प्रदीप आवटे यांनी सांगितलं आहे. ऑक्सिजन तपासणीसाठी आशा वर्कर आणि सामाजिक कार्यकर्ते काम करत आहेत असंही ते म्हणाले. महाराष्ट्रातील मृत्यू दर सध्या 3.18 टक्के आहे.

सार्वजनिक आरोग्य विश्लेषक रवी दुग्गल यांनी यापूर्वी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, राज्य आपल्या जीडीपीच्या तुलनेत आरोग्य सुविधेवर फक्त 0.5 टक्के एवढाच खर्च करतं जो राष्ट्रीय सरासरीच्या निम्मा आहे. मुंबईत सध्या 1.42 लाख रुग्णांसह सर्वाधिक बाधित महापालिका क्षेत्रात आहे. यानंतर पुणे (96,692) आणि पिंपरी चिंचवड (45093) यांचा क्रमांक लागतो.