Corona Vaccination 2.0 : डॉ. हर्षवर्धन यांच्यानंतर कमल हसन यांनी घेतली लस; वाचा कोणी-कोणी घेतली लस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना व्हायरसवरील लसीकरणाचा दुसरा टप्पा एक मार्चपासून सुरु झाला आहे. या टप्प्यात 60 पेक्षा जास्त आणि 45 वर्षांवरील लोक ज्यांना गंभीर आजाराने ग्रासले आहे, त्यांनाही लस दिली जात आहे. ही लस सरकारसह खाजगी रुग्णालयात दिली जात आहे. या लसीची किंमत 250 रुपये ठेवली आहे. डॉ. हर्षवर्धन यांच्यानंतर अभिनेता आणि राजकारणी कमल हसन यांनीही लस घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्समध्ये जाऊन काल (सोमवार) लस घेतली. त्यानंतर उपराष्ट्रपती यांच्यासह अनेक नेत्यांनी कोरोनावरील लस घेतली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी त्यांच्या पत्नीसह लस घेतली. तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनीही लस घेतली. त्यानंतर रविशंकर प्रसाद यांनीही लस घेतली. त्यांनी बिहार येथील पटना एम्स येथे जाऊन लस घेतली.

दरम्यान, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी उत्तर प्रदेशातील रामपूर येथे जाऊन कोरोनावरील लस घेतली. अभिनेता आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी चेन्नई येथे जाऊन कोरोनावरील पहिली लस घेतली. याबाबतची माहिती ट्विटरवर देण्यात आली आहे.