खाजगी रुग्णालयांत 250 रुपयांना मिळणार ‘कोरोना’ लसीचा एक डोस, सरकार लवकरच करणार घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना साथीच्या कहरादरम्यान भारतात लसीकरण कार्यक्रम सुरु झाला आहे. या लसीकरणाचा पहिला टप्पा 16 जानेवारीपासून सुरु झाला होता, ज्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लसीचा डोस देण्यात आला होता. यांनतर आता एक मार्च पासून देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या दरम्यान, आता खासगी रुग्णालयांत देखील कोरोना लस उपलब्ध होणार असून या लसीची किंमत प्रति डोस 250 रुपये असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्यात, 100 रुपये सेवा शुल्क समाविष्ट आहे. याबाबत केंद्र सरकार लवकरच घोषणा करू शकते. दरम्यान याआधी केवळ सरकारी केंद्रांवरच दोन्ही लस विनामूल्य दिल्या जात होत्या.

लसीकरणाच्या या दुसऱ्या टप्प्यात , 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लसी दिली जाईल. तसेच , 45 वर्षे ते 60 वर्षे वयोगटातील लोकांना देखील लस डोस दिला जाईल, परंतु या वयोगटातील फक्त अशाच लोकांना लस दिली जाईल, जे आधीपासून कोणत्यातरी गंभीर आजाराने ग्रस्त आहे.

Advt.

शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात अशा 6 राज्यात कोरोना वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोनाची नवीन प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत राज्यांत 8,333 नवीन प्रकरणे नोंदविली गेली. यानंतर, केरळमध्ये 3,671 आणि पंजाबमध्ये 622 नवीन प्रकरणे नोंदविली गेली. मंत्रालयाने म्हटले की, गेल्या 24 तासांत एकूण 16,488 नवीन प्रकरणांपैकी 85.75 टक्के प्रकरणे 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. दरम्यान, या राज्यांतील वाढती कोरोना प्रकरणे पाहता कॅबिनेट सचिवांची आज बैठक झाली. यावेळी कोरोना संसर्गाची गती कमी करण्यासाठी आणि त्यास सामोरे जाण्यासाठी चर्चा झाली.

यादरम्यान, 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 24 तासांत कोरोनामुळे कुणाचा मृत्यू झाला नाही. ज्यात गुजरात, ओडिसा , चंडीगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, पुडुचेरी, मणिपूर, मिझोरम, लक्षद्वीप, लडाख, सिक्किम, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली, अंदमान आणि निकोबार बेटे, त्रिपुरा, मेघालय, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

संपूर्ण देशातील प्रकारणांबाबत बोलायचे झाल्यास गेल्या 24 तासांत कोरोनाची 16,488 नवीन प्रकरणे उघडकीस आली आहेत. तर 113 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, कोरोनातून 12771 लोकही बरे झाले. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 1,10,79,979 रुग्ण आढळले आहेत. तर बरे होणाऱ्यांची एकूण संख्या 1,07,63,451 आहे. तर अद्याप 1,59,590 सक्रिय प्रकरणे आहेत. विशेष म्हणजे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आतापर्यंत 1,42,42,547 लोकांना लसी देण्यात आली आहे. यामध्ये 66,68,974 आरोग्य सेवा कर्मचारी आणि 51,19,695 फ्रंटलाईन वर्कर्सचा समावेश आहे.