Coronavirus : मुंबईत ‘कोरोना’चे थैमान ! 11 लाख घरं सील तर 50 लाख लोकांना बाहेर पडण्यास ‘मज्जाव’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधितांचा आकडा एक लाखाच्या आसपास पोहचला आहे. तर कोरोनामुळे राज्यातील अनेक महत्त्वाची शहरं कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झाला आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासन युद्ध पातळीवर या ठिकाणी काम करत आहे. कोरोना बाधित रुग्ण जिथे आहेत ती इमारत आणि झोपडपट्ट्यांना प्रशासनाकडून सील करण्यात येते. मुंबईत अशी 11 लाखापेक्षा जास्त घरे सील करण्यात आली असून 50 लाखापेक्षा अधिक लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.मुंबईत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात जेवढे कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी निम्मे रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांनी संख्या 52 हजाराचा टप्पा यापूर्वीच ओलांडला आहे.

सध्या मुंबईत 26 हजारापेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत. म्हणजेच सध्या ज्या रुग्णावर उपचार सुरु आहेत ते रुग्ण अ‍ॅक्टिव्ह मानले जातात. कोरोनाचा रुग्ण ज्या घरात सापडले त्या घरांना एपिसेन्टर मानत तिथला संसर्ग दुसरीकडे पसरू नये म्हणून त्या घरांना आणि भागांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केलं जातं. आणि काही काळापुरती ती घरं किंवा भाग सील केला जातो. म्हणजेच त्या परिसरातून कोणताही व्यक्ती बाहेर पडू शकत नाही. किंवा कोणत्याही व्यक्तीला त्या परिसरात जाता येत नाही. शिवाय अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती सोडल्या तर.

सध्या मुंबईमध्ये अशी 11 लाख 30 हजार 765 इतकी घरं आहेत. त्यापैकी झोपडपट्टीतील 9 लाख 50 हजार 578 तर इमारतीमधील 1 लाख 80 हजार 187 एवढी घरं सील करण्यात आली आहेत. मुंबईत जवळपास 50 लाख लोकांना सद्या घराच्या बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रशासनाने सील केलेल्या या घरांमध्ये 50 लाख 20 हजार 538 एवढी लोकं वास्तव्य करत आहेत. या लोकांना सध्या कोठेही ये-जा करता येत नाही.