Coronavirus : राजधानी दिल्लीत ‘कोरोना’ बाधितांचा आकडा 1 लाखाच्या पुढं, आतापर्यंत तब्बल 3115 जणांचा मृत्यू

दिल्ली : वृत्तसंस्था –  राष्ट्रीय राजधानीमध्ये कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. राजधानी दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 1 लाखाच्या वर गेला आहे. आज दिल्लीमध्ये 1379 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्याची संख्या 1 लाख 823 इतकी झाली आहे. दिल्लीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतत्न केले जात आहेत.

दिल्लीमध्ये आज कोरोना विषाणूची 1379 नवीन प्रकरण आल्यानंतर संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 100823 इतकी झाली. त्यापैकी 72 हजार 88 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. सध्या राजधानी दिल्लीमध्ये 25 हजार 620 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासामध्ये दिल्लीत 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3115 झाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकार सोबत नियोजन करून कोविड-19 ला समर्पित रुग्णालयात बेडची संख्या वाढवली आहे. पंचतारांकित हॉटल्स खासगी रुग्णालयांना जोडण्यात आली आहेत. 13500 बेड कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. यात हॉटेलमधील बेडची संख्या 3500 हजार आहे. 4 हजार बेड्सवर ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे.