‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शास्त्रज्ञांकडून अशा झाल्या पल्लवीत, जाणून घ्या कस ‘टी-सेल’ रूग्णांना मृत्यूपासून वाचवणार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनाचा कहर रोखण्यासाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या वैज्ञानिकांना आशेचा किरण दिसला आहे. माहितीनुसार, कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या लोकांमध्ये रोगप्रतिकारक पेशींच्या (इम्यून सेल किंवा टी-पेशी) संख्येत लक्षणीय घट होते. दरम्यान, टी-सेल्सची संख्या वाढविल्यास लोकांचा जीव वाचू शकतो की नाही, यावर यूकेचे शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. इतर अनेक आजारांमध्ये हा उपाय खूप प्रभावी ठरला आहे.

टी-सेल्स म्हणजे काय ?
तज्ञांच्या मते, जेव्हा जेव्हा कोणत्याही प्रकारचा विषाणू शरीरावर आक्रमण करतो, तेव्हा या टी-सेल्स त्यापासून लढा देण्याचे काम करतात आणि रोगाचा प्रसार शरीरातून बाहेर टाकतात. निरोगी व्यक्तीच्या रक्ताच्या मायक्रोलिटरमध्ये सहसा 2000 ते 4800 टी-सेल्स असतात. त्यांना टी-लिम्फोसाइट्स देखील म्हणतात. वैज्ञानिकांना चाचण्यांमध्ये आढळले आहे की, कोरोनाच्या रुग्णांमध्ये याची संख्या 200 ते 1000 पर्यंत पोहोचली आहे. म्हणूनच त्यांची प्रकृती गंभीर बनते. टी-सेल्सची घसरत जाणारी संख्या म्हणजे व्यक्तीस कोणते ना कोणते संक्रमण होण्याची जास्त शक्यता असते. इतर बर्‍याच रोगांमध्ये, डॉक्टरांनी त्याची संख्या वाढविण्यासाठी इंटरलेयूकिन 7 नावाचे औषध वापरले आहे, जे खूप प्रभावी आहे. आता किंग्ज कॉलेज लंडनच्या फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूट आणि गेज अँड सेंट थॉमस हॉस्पिटलमधील वैज्ञानिक कोरोना रूग्णांवर या औषधाची क्लिनिकल चाचण्या करीत आहेत. डॉक्टरांना आढळले की, आयसीयूमध्ये येणाऱ्या 70% कोरोना पीडित लोकांमध्ये टी-सेलची संख्या 4000 वरून 400 वर आली आहे. तसेच, दोन संशोधनात दिसून आले आहे की, टी-सेल्सची संख्या जास्त असलेल्या व्यक्तींना संक्रमण झाले नाही.

क्रिक इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर अ‍ॅड्रियन हेडे यांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणू आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर वेगळ्या पद्धतीने हल्ला करतो. तो थेट टी-सेल्सचा नाश करण्यास सुरवात करतो. जर आपण रुग्णांमध्ये टी-सेल्सची संख्या वाढविण्यात यशस्वी ठरलो तर एक मोठी कामगिरी होईल. त्याचप्रमाणे कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या व्हायरोलॉजिस्ट अँजेला रास्मुसेन म्हणाल्या की, हे खूप उत्साहजनक आहे. असे आढळून आले आहे की, जस जसे कोरोनाचे रुग्ण बरे होतात, त्यांच्या टी-सेल्सची संख्या वाढते. यामुळे लस तयार करण्यासाठी मोठी मदत मिळू शकते.

कर्करोगाच्या उपचारात उपयुक्त
इंग्लंडमधील कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना आढळले की, किलर टी-सेल्स कर्करोगाच्या उपचारात खूप प्रभावी आहेत. या थेरपीमध्ये, प्रतिरोधक पेशी काढून, त्यात किंचित सुधारणा करून रुग्णाच्या रक्तामध्ये परत टाकल्या जातात, जेणेकरून या प्रतिरोधक पेशी कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकतील.