‘कोरोना’च्या रूग्णानं वृत्तपत्रात वाचली त्याच्या ‘मृत्यू’ची बातमी, एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करत म्हणाला – ‘मी जिवंत आहे’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील उज्जैनमधील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. शहरातील आरडी गार्गी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका युवकाने वृत्तपत्रात जेव्हा त्याच्या मृत्यूची बातमी वाचली तेव्हा त्याचा विश्वास बसला नाही. त्यानंतर त्याने सोशल मीडियाचा आधार घेतला आणि एक व्हिडिओ बनवून पोस्ट केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आरोग्य विभागात पोहोचला. व्हिडिओ पाहताच अधिकारी सतर्क झाले आणि तपास सुरू केला. यानंतर विभागाने यास मोठा निष्काळजीपणा मानून संबंधित डॉक्टरांना या प्रकरणाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये कोरोना रुग्ण सांगत आहे, ‘मला दोन दिवसांपूर्वी आरडी गार्गी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मी शनिवारी एका वृत्तपत्रात वाचले की माझा मृत्यू झाला आहे, परंतु मी जिवंत आहे.’ त्याने लोकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्यास देखील सांगितले.

यासंदर्भात उज्जैनचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी (CMHO) डॉ. अनसुइया गवाली म्हणाल्या, ‘गुरुवारी मृत्यू झालेल्या 60 वर्षांच्या कोरोना रूग्णाच्या जागी त्या तरूणाचे नाव नोंदविण्यात आले.’ दरम्यान या प्रकरणात सामील असलेल्या डॉक्टरांनी आपली चूक मान्य केली. नाव आणि पत्त्यातील गैरसमजांमुळे हे घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सीएमएचओने सांगितले की डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून आपल्यावर कारवाई का केली जाऊ नये असे विचारले. भविष्यात अशा प्रकारच्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे.