‘सिरम’ची कोविशिल्ड लस भारतातच सर्वात महाग

नवी दिल्ली : सिरम इन्स्टिट्युटने कोविशिल्ड लशीच्या किंमतीची घोषणा केली असून त्यापाठोपाठ त्यांच्यावर टिका सुरु झाली आहे. सिरम जगभर ज्या किंमतीला लस विकणार आहे, त्यापेक्षा अधिक किंमतीला भारतातील खासगी हॉस्पिटलला देणार असल्याची टिका सुरु झाली आहे. लशीच्या वेगवेगळ्या किंमतीवरुनही विरोधकांनी केंद्र सरकार आणि सिरम इन्स्टिट्युटला धारेवर धरले आहे.

सिरमची कोविशिल्ड केंद्र सरकारला १५० रुपयांना मिळणार आहे. तर राज्य शासनाला ४०० रुपये आणि खासगी हॉस्पिटलला ६०० रुपयांना मिळणार आहे. त्याचवेळी ही लस जगभरात किती किमंतीला विकली जाणार आहे, याची माहिती सिरमने जाहीर केली. ती किंमत पाहून असंख्य लोकांना धक्का बसला आहे.

सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड ची निर्मिती भारतात पुण्यात होत आहे. जगातील सर्वाधिक लस निर्मिती करणारी कंपनी म्हणून ती जगभर प्रसिद्ध आहे. भारतात निर्मिती होत असल्याने तिला लशीच्या वितरणासाठी देशात कमी खर्च येऊ शकतो. त्याचवेळी अमेरिकेपासून इतर देशांना हवाई प्रवासाद्वारे वितरणाचा खर्च जास्त येऊ शकतो. असे असताना भारतात ही लस सर्वात महाग उपलब्ध होणार आहे.

भारतात ही लस साधारण ६०० रुपयांना म्हणजे ८ डॉलरला मिळणार आहे. त्याचवेळी भारतातील दरापेक्षा निम्म्या म्हणजे ४ डॉलरला अमेरिका, बांगला देशाला मिळणार आहे. त्यापेक्षा कमी किंमतीला म्हणजे २.१५ ते ५.२५ डॉलर ला अरब अमिरातीला मिळणार आहे.

वेगवेगळ्या देशांना कोविशिल्डची लस मिळणारे दर
भारत ८ डॉलर
सौदी ५़२५ डॉलर
अमेरिका ४ डॉलर
ब्राझिल ३.१५ डॉलर
युके ३ डॉलर
ई यु २.१५ ते ३.५० डॉलर
दक्षिण अफ्रिका ५.२५ डॉलर
बांगला देश ४ डॉलर
श्रीलंका ४.५० ते ५ डॉलर