परदेशात जाऊन बलात्काराच्या आरोपीच्या मुसक्या आवळणार्‍या पहिल्या IPS महिला अधिकारी बनल्या मेरीन जोसेफ

कोल्लम : वृत्तसंस्था – सुट्टीवर आलेल्या त्या तरुणाने आपल्या मित्राच्या पुतणीचे तीन महिने लैगिंक शोषण केले. त्यामुळे तिने आत्महत्या केली. तोपर्यंत तो सौदीला पळून गेला. या आरोपीची ओळख करुन दिल्याने पश्यातापाने आणखी एकाने आत्महत्या केली. लोकांमध्ये या घटनेची चीड होती. पण, दोन वर्षे देशाबाहेर फरार असलेल्या या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे काहीच प्रयत्न होत नव्हते. मेरीन जोसेफ यांनी जून २०१९ मध्ये कोल्लमच्या पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. या प्रकरणात स्वत: लक्ष घालून त्यांनी थेट सौदी अरेबिया गाठले आणि आरोपीला बेड्या घालूनच त्या भारतात परतल्या.

सुनील कुमार भद्रान (वय २८) असे या आरोपीचे नाव आहे. कोल्लमच्या पोलीस आयुक्त मेरीन जोसेफ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला आता भारतात आणले आहे. सौदीमधून गुन्हेगाराला आणण्याच्या प्रक्रियेत कितीही अडथळे आले तरी त्यावर मात करीत मेरीन जोसेफ यांनी आपला निर्धार पूर्ण केला आहे.
मुळचा कोल्लमचा असलेला सुनिल कुमार हा सौदी अरेबियात टाईल कामगार म्हणून काम करायचा. २०१७ मध्ये तो सुट्टीमध्ये केरळला आला होता. त्यावेळी त्याने मित्राच्या पुतणीचे तीन महिने लैंगिक शोषण केले. या त्रासाला कंटाळून तिने अखेर आत्महत्या केली.

पोलिसांनी सुनिलकुमारवर गुन्हा दाखल केला. पण तोपर्यंत तो सौदीला पळून गेला होता. पोलिसांनी सुनिल विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली. मुलीच्या काकांनी ज्यांनी सुनील कुमारची या कुटुंबाबरोबर ओळख करुन दिली होती. त्यांनी सुद्धा आत्महत्या केली. पोलिसांनी इंटरपोल मार्फत नोटीस जारी केली होती.

मेरीन जोसेफ यांनी जून २०१९ मध्ये कोल्लमच्या पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा आढावा घेताना त्यांच्यासमोर हे प्रकरण आले. तेव्हा २ वर्षांपासून आरोपी फरार होता. लोकांच्या मनात या घटनेबद्दल संताप होता. आरोपींच्या अटकेसाठी केरळ पोलिसांनी आंतरराष्ट्रीय तपास विभागाने सौदी पोलिसांकडे पाठपुरावा करत होते. पण, त्याला प्रतिसाद मिळत नव्हता.

२०१० साली पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सौदीचे राजे अब्दुल्ला यांच्यामध्ये गुन्हेगार हस्तांतरणाचा करार झाला. केरळमध्ये गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेले अनेक जण सौदीला पळून गेले आहेत. अनेक आयपीएस अधिकारी परदेशात आरोपीला अटक करायची असेल तर ज्युनिअर अधिकाऱ्यांना निवडतात. पण मेरीन यांनी स्वत: जाण्याचा निर्णय घेतला आणि आरोपीला पकडूनच तेथून परत येण्याचा निर्धार केला. त्यानुसार त्यांनी स्वत: प्रत्यक्ष सौदी अरेबियाला जाऊन आरोपीच्या हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया पार करुन सुनील कुमार याला घेऊनच ते पथक भारत परत आले.

तब्बल दोन वर्षे अडकून असलेले हे प्रकरण त्यांनी एक महिन्याच्या आत पूर्ण केल्याने मेरीन जोसेफ यांच्या कामगिरीमुळे सर्व केरळमध्ये त्यांचे कौतुक होत आहे.

Loading...
You might also like